क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अंडर 18 हॉकी मेन्स टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. हॉकी ज्युनिअर टीम इंडिया आशिया कप विजेता ठरली आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये यजमान जपानचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने जपानवर 4-1 ने मात करत गोल्ड मेडलची कमाई केली. आशीष तानी पूर्ती हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. आशिषने महाअंतिम सामन्यात गोल्सची हॅट्रिक लगावत भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं.
टीम इंडियाने सामन्यावर सुरुवातीपासूनच घट्ट पकड मिळवली. टीम इंडियाने दुसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेतला. आशीषने गोल करत करत भारताचं खातं उघडलं. भारताने 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर जपानने जोरदार झुंज दिली. मात्र त्यांना भारतीय खेळाडूंसमोर यश आलं नाही. टीम इंडियाने दुसऱ्या सत्रातील शेवटच्या काही मिनिटांमध्ये सामन्यावरील पकड मजबूत केली.
आशीषने सामन्यातील 28 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. टीम इंडियाने यासह आपली आघाडी 2-0 अशा फरकाने मजबूत केली. त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला कमाल झाली. प्रहलाद राजभर याने 30 व्या मिनिटाला कॅप्टन केतन कुशवाहा याला अचूक पास दिला. केतनने कोणतीही चूक न करता फिल्ड गोल केला. टीम इंडियाने अशाप्रकारे हाफ टाईमपर्यंत आपली आघाडी 3-0 अशी केली.
पहिल्या हाफनंतर खेळाला सुरुवात झाली. वरिंदर सिंह याच्यामुळे टीम इंडियाला 34 व्या मिनिटाला पेन्लटी कॉर्नरची संधी मिळाली. आशीषने ही संधी न दवडता गोल केला. आशीषने यासह गोल करण्याची हॅट्रिक केली. टीम इंडियाची आघाडी अशाप्रकारे 4-0 अशी झाली.
त्यानंतर चौथ्या सत्रात जपानचं खातं उघडलं. नुमादा गाकु याने 52 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. भारताने अशाप्रकारे हा सामना 4-1 ने जिंकला आणि आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
तसेच वुमन्स टीम इंडियाने कांस्य पदकाची कमाई केली. मेन्स आणि वुमन्सच्या विजयानंतर हॉकी टीम इंडियाकडून दोन्ही संघांसाठी बक्षिस रक्कम जाहीर करण्यात आली. त्यानुसार अंडर 18 हॉकी टीम इंडियातील विजेत्या खेळाडूला प्रत्येकी 3 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तर सपोर्ट स्टाफसाठी निम्मे अर्थात दीड लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत.
दरम्यान हॉकी इंडियाकडून अंडर 18 वुमन्स टीमसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये बक्षिस जाहीर करण्यात आलं. तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.