Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसकळत असल्यामुळं शेती पिकांचं विशेषत: फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सातारा जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळाला. वाई तालुक्यातील भुईंज, जोशीविहीर परिसरात पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला फटका बसला आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर जळगावमध्येही जोरदार पाऊस झाला आहे.
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कार पाण्यात अडकून पडली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत जीप आणि पिकअपच्या सहाय्याने कार सुरक्षित बाहेर काढली. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या निचरा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला फटका दिला असून नुकतीच लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटसह टोमॅटो पिकांवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या टोमॅटोला बाजारात चांगला दर मिळत असतानाच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवथर परिसरात सुसाट वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे विजेचा खांब कोसळून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एकूणच अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यात निसर्गाचा रौद्रावतार दाखवत वाहतूक, वीजपुरवठा आणि शेती व्यवस्थेला मोठा फटका दिला असून प्रशासन सतर्क झाले आहे
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याचे पत्रे उडून कोसळले आहेत. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र टोल नाक्याच्या एका बाजूचे पत्रे व लोखंडी अँगल कोसळल्यामुळे टोल नाक्यावरील दोन लेन करण्यात आल्या बंद आहेत.
बारामती तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळला आहे. यामुळं शेती पिकांच नुकसान झालं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे नुकसान ग्रस्त केळीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तसेच आणखी किती नुकसान झालं आहे याची माहीती घेऊन सरकारकडून मदत दिली जाईल असे सुनेत्रा पवार म्हणल्यात. तसेच राज्यसभेच्या जागेवर अनेक नाव चर्चेत आहे आणि असतात आज संध्याकाळपर्यत किंवा उद्या सकाळपर्यंत नाव समजेल असे सुनेत्रा पवार म्हणल्या.
परभणी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने मोठी दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. पूर्णा तालुक्यातील पूर्णा झिरो फाटा मार्गावर मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे वाहनचालकांना काही काळ मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाकडून झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दरम्यान, माटेगाव ते लक्ष्मणनगर पाटी या मार्गावर चक्रीवादळासारखे तीव्र वादळवारे वाहिल्याने अनेक झाडे उन्मळून पडली. परिणामी हा मार्गही काही काळासाठी बंद झाला. परिसरातील नागरिकांनी वादळाचा मोठा फटका बसल्याचे सांगितले.