बुलढाण्यातील बहुचर्चित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पुन्हा ट्विस्ट; कळमेकर पिता पुत्रांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले...
डॉ. संजय महाजन June 07, 2026 10:13 AM

Buldhana Criem Case : बुलढाण्यातील बहुचर्चित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड (Shivani Kalmekar Crime Case) प्रकरणात अजून एक नवीन वळण मिळाल आहे. आपल्याच मुलीची न केलेल्या हत्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील खडकी येथील आदिवासी समाजाच्या बापूराम कळमेकर व अजय कळमेकर पिता पुत्रांना 22 दिवस जेलमध्ये (Crime) डांबून ठेवलं होतं. मात्र शिवानी बुलढाणा पोलिसांसमोर जिवंत हजर झाल्याने बुलढाणा पोलिसांच बिंग फुटलं आणि पिता पुत्राला न्यायालयाने दोषमुक्त केल. हे प्रकरण "एबीपी माझा" ने लावून धरल्यानंतर आणि जेलमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कळमेकर पिता पुत्रांनी 'एबीपी माझा' शी बोलताना "पोलिसांनी आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला त्यामुळे आम्ही दोषी आहोत' असं सांगितलं होतं, मात्र आता कळमेकर पितापुत्राने पोलिसांवर मोठा आरोप केल्याचा एक व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. (Shivani Kalmekar Buldhana Criem Case)

Shivani Kalmekar Case: ...तर तुमच्या सर्व कुटुंबाला उचलून नेऊ, पाच लाख रुपये पोलिसांनी मागितल्याचा गौप्यस्फोट

कळमेकर पिता पुत्राने. 'पोलिसांनी आम्हाला जंगलात फिरवून मोठ्या प्रमाणात मारहाण केली, ही हत्या तुम्हीच केली, असं तुम्ही नाही सांगितलं तर तुमच्या सर्व कुटुंबाला उचलून नेऊ..' मारहाण करत आमच्याकडून हा खून आम्हीच केला असं कबूल करून घेतलं, तसंच आम्हाला सोडायचं असल्यास पाच लाख रुपये पोलिसांनी मागितल्याचा गौप्यस्फोट एका व्हिडिओद्वारे कळमेकर पिता पुत्रांनी केला आहे. हा व्हिडिओ 'एबीपी माझा' च्या हाती लागला आहे. यामुळे मात्र बुलढाणा पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Buldhana Criem Case : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची 'चुप्पी', माहिती घेण्यासाठी सदानंद दाते अमरावती

विशेष म्हणजे अद्याप या प्रकरणात बुलढाणा पोलिसांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माध्यमाना कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची 'चुप्पी' या प्रकरणात किती पाणी मुरलंय हे सांगून जातंय. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली असून उद्या खास याच प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी सदानंद दाते हे अमरावती येथे येणार असल्याची माहिती आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी यावं लागत असल्याने पून्हा यात काय ट्विस्ट येतो व दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय करवाई होते हे बघणं महत्वाचं असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.