राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर प्रथमच सोमवारी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीत 23 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पराभवानंतर प्रथमच ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावरपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी हे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. हो दोघेही विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. मात्र, तामिळनाडू निवडणुकीतील पराभव आणि टीव्हीके सरकारला काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यानंतर डीएमकेने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. डीएमकेच्या नेत्यांनी या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसेच आम आदमी पार्टीही बैठकीत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. आता उद्याच्या बैठकीत सीपीएम आणि काँग्रेसमधील मतभेद उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या आरोपांमुळे माकप नाराजकेरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्यातील वादावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सीपीएमचे महासचिव एम ए बेबी यांनी खरगे यांना पत्र लिहून काँग्रेस नेत्यांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. केरळमध्ये सीपीएमने भाजपाशी संगनमत केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एम ए बेबी यांनी आपल्या पत्रात, ‘अशा प्रकारचे आरोप इंडिया आघाडीच्या भावनेला धरून नाहीत. तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याविरोधात चौकशीची मागणी करून काँग्रेस नेते विरोधी एकजूट कमकुवत करत आहेत का? असा सवालही उपस्थित केला आहे. मतभेद असूनही सीपीएमने बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून पक्षाचे प्रतिनिधित्व राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास करणार आहेत.
माकप नेते हनान मोल्ला यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ‘आघाडीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. सर्वात मोठ्या पक्षाची जबाबदारी आघाडी टिकवून ठेवण्याची असते, पण काँग्रेस नेते आवश्यक परिपक्वता दाखवत नाहीत.’ मोल्ला यांनी डीएमके आणि सीपीएमवर टीका केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
बैठकीचा अजेंडा काय आहे?विरोधकांच्या या बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष एकत्र आहेत. काही पक्ष बैठकीत सहभागी होणार नसल्याचे मान्य करत त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधातील लढा सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.