Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..
esakal June 08, 2026 02:45 AM

-अमित गवळे

पाली: प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आणि अपघातांच्या सत्राला अखेर चाप बसणार आहे. पाली नगरपंचायतीने केलेल्या ठरावाची आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाली शहरातील मुख्य मार्गांवर सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सर्व प्रकारच्या अवजड वाहन वाहतुकीस (डम्पर व इतर मोठी वाहने) पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून डंपरच्या मनस्तापाने त्रस्त असलेल्या पालीकरांना आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाली हे अष्टविनायकातील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक, पर्यटक, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, शहरातील अरुंद रस्त्यांवरून सातत्याने होणाऱ्या ओव्हरलोड डंपर व अवजड वाहतुकीमुळे दररोज वाहतूक कोंडी, खडी-भुगा रस्त्यावर सांडणे, ध्वनी व वायू प्रदूषण आणि गंभीर अपघातांचे सत्र सुरू होते. या वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला आणि सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाली नगरपंचायतीने सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १९७ (दिनांक २७ फेब्रुवारी २०२६) मंजूर केला होता आणि शहरात अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पालीकर नागरिक तसेच सुधागड तालुका भाजप अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे व पालिकर नागरिकांनी याबाबत सह्यांचे निवेदन देखील दिले होते. नगरपंचायतीच्या या ठरावाला आणि जनतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

या वाहनांना सूट

या बंदीच्या काळात शहराचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, म्हणून काही वाहनांना विशेष सूट देण्यात आली आहे. यात दुध आणि पाण्याचे टँकर, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचे गॅस वाहने, औषधे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने या वाहनांना या नियमातून वगळण्यात आले आहे.

या निर्णयामुळे काय बदलणार?

दिवसा अवजड वाहने बंद झाल्याने दुचाकी घसरणे आणि वाहनांना धडक बसण्याचे अपघात थांबतील. शहरात उडणारा धुळीचा धुरळा, बारीक खडीचा भुगा आणि ध्वनी प्रदूषणापासून सुटका होईल. अरुंद रस्त्यांवर डंपर अडकून पडत असल्यामुळे होणारी दैनंदिन कोंडी फुटेल. शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि मंदिरात येणारे भाविक आता निर्भयपणे रस्त्यावरून चालू शकतील.

Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधित खात्यांनी तातडीने दखल घेऊन आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. पाली नगरपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी घेतलेला ठराव आता प्रत्यक्षात उतरला असून, हा निर्णय पालीकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पराग मेहता, नगराध्यक्ष, पाली नगरपंचायत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.