Sourav Ganguly : सगळेच कौतुक करतायत पण सौरव गांगुली वैभव सूर्यवंशीबद्दल इतरांपेक्षा वेगळं बोलला, कौतुक आणि वास्तवातला फरक दाखवला
Tv9 Marathi June 08, 2026 01:45 PM

सध्याचे दिवस वैभव सूर्यवंशीसाठी स्वप्नवत आहेत. यश, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही त्याला सहज मिळत आहे. अर्थात हे सर्व शक्य झालय ते त्याच्या टॅलेंटमुळे यात कुठलही दुमत नाही. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित खेळाडूंपैकी तो एक आहे. वैभव सूर्यवंशीवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू त्याचं कौतुक करतायत. पण भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली इतरांपेक्षा वेगळं बोललाय. त्याने वैभव सूर्यवंशीला वास्तवाची जाणीव करुन दिली आहे. सौरव गांगुलीच्या मते आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फरक आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याशिवाय वैभव सूर्यवंशीची एशियन गेम्स 2026 साठी सुद्धा टीम इंडियात निवड झाली आहे.

“सौरव गांगुलीच्या मते वैभव सूर्यवंशी आता फक्त 15 वर्षांचा असून लोकांनी त्याच्याकडून कुठल्याही चत्मकाराची अपेक्षा ठेऊ नये. वैभव अजून बरचं काही शिकणार आहे. टीम इंडियात खेळताना कदाचित त्याच्यावर जास्त दबाव नसेल. इंग्लंड आणि आयर्लंडमधली परिस्थिती वेगळी असेल. स्विंग होणारे चेंडू खेळणं भरपूर कठीण असतं” असा सौरव गांगुलीने न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना वैभव सुर्यवंशीला इशारा दिला आहे.

तिथली परिस्थिती वेगळी असेल

“वैभवसाठी टीम इंडियाकडून खेळणं एक वेगळा अनुभव असेल. आता तो अशा पीचेसवर खेळणार आहे, जे भारतापेक्षा वेगळे आहेत. चेंडू सीमा होणार, जास्त बाऊन्स असेल. नव्या चेंडूत मूवमेंट सुद्धा असेल. तिथली परिस्थिती वेगळी असेल. पण मला वाटतं वैभवकडे प्रतिभेची कमी नाही” असं सौरव गांगुली म्हणाला.

आयर्लंड विरुद्ध सामने किती तारखेला?

टीम इंडियात सेटल होण्यासाठी वैभव सूर्यवंशीला वेळ दिला पाहिजे असं सौरव गांगुलीचं मत आहे. 15 वर्षाच्या खेळाडूकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही चमत्काराची अपेक्षा ठेवणं चुकीच आहे असं गांगुली म्हणाला. 26 जून आणि 28 जून रोजी टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध दोन टी20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड दौरा असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.