वैभव सूर्यवंशी वर सौरव गांगुली : वय फक्त 15 वर्षे… पण नाव संपूर्ण क्रिकेटविश्वात गाजत आहे. आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीनंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याचे टीम इंडियात निवड होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी त्याला वास्तवाची जाणीव करून देणारा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. गांगुलींच्या मते, आयपीएलमध्ये यश मिळवणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने चमकणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे वैभवकडून लगेचच चमत्काराची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही.
“इंग्लंड-आयर्लंडमध्ये खरी परीक्षा होणार….” – सौरव गांगुली (Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi)
पीटीआयशी बोलताना गांगुली म्हणाले की, इंग्लंड आणि आयर्लंडमधील खेळपट्ट्या भारतीय परिस्थितींपेक्षा खूप वेगळ्या असतात. तिथे चेंडू अधिक स्विंग होतो, सीम मूव्हमेंट मिळते आणि अतिरिक्त उसळीही असते. अशा परिस्थितीत फलंदाजी करणे कोणत्याही युवा खेळाडूसाठी मोठे आव्हान असते. गांगुली म्हणाले, “टीम इंडियासाठी खेळणे वेगळे असते. आता वैभव अशा खेळपट्ट्यांवर खेळणार आहे जिथे चेंडू अधिक सीम आणि स्विंग होईल. नव्या चेंडूविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नसते. परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. मात्र त्याच्याकडे प्रतिभेची कमतरता नाही.”
“15 वर्षांच्या मुलाकडून चमत्काराची अपेक्षा नको…” – सौरव गांगुली (Sourav Ganguly on Vaibhav Sooryavanshi)
‘दादा’ यांनी चाहत्यांनाही संयम बाळगण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, अवघ्या 15 वर्षांच्या खेळाडूकडून लगेचच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठमोठ्या पराक्रमांची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. गांगुली म्हणाले की, वैभव अजून शिकण्याच्या प्रक्रियेत आहे. टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकू नये.
आयर्लंडविरुद्ध मिळू शकते पदार्पणाची संधी
भारतीय संघ 26 आणि 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असून तिथे त्याच्या क्षमतेची खरी कसोटी लागणार आहे. वैभवकडे अफाट प्रतिभा आहे, पण गांगुलींचा संदेश स्पष्ट आहे “घाई करू नका, हा हिरा आहे… पण त्याला चमकण्यासाठी वेळ द्यावा लागेल!”
हे ही वाचा –