Hinjewadi Metro : हिंजवडी मेट्रोचा प्रवास कागदावरच! सहा मुहूर्त टळले; कामे पूर्ण न झाल्याने तारीख पे तारीख
esakal June 10, 2026 03:45 AM

- अविनाश ढगे

पुणे/पिंपरी - हिंजवडीच्या वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकून आम्ही अक्षरशः वैतागून गेलो आहोत. दररोजचे तीन ते चार तास नुसते या कोंडीतच वाया जातात. प्रशासनाला आमच्या मौल्यवान वेळेची आणि या रोजच्या त्रासाची काहीच किंमत उरलेली नाही का? मेट्रो कधी सुरू होईल आणि आमची या कोंडीतून कधी सुटका होईल, याचा कोणताच नेम नाही. नुसते मुहूर्तच जाहीर करत आहेत, कागदावरील मेट्रो जमिनीवर कधी धावणार, असा संतप्तवजा सवाल आयटीयन्स समीर आणि त्यांच्या मित्रांनी उपस्थित केला.

हिंजवडीला जाणाऱ्या प्रत्येक पुणेकराची आज हीच संतप्त भावना बनली आहे. पीएमआरडीएच्या नियंत्रणाखालील २३ किमीच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी प्रशासनाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किमीचा मेट्रो मार्ग आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही मार्गिका आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे नियंत्रण आहे.

सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वयासाठी ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’ लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. यांच्याकडून या मार्गिकेचे काम सुरू आहे. मार्च २०२५ पर्यंत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. पण, विविध कारणास्तव मेट्रो कामाला उशीर होत गेला.

पीएमआरडीए प्रशासनाकडून मेट्रो सेवा सुरु करण्याबाबत आतापर्यंत पाच ते सहा मुहूर्त जाहीर करण्यात आले. कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईनही देण्यात आल्या. परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे ही सेवा कागदावरच असल्याचे दिसून येते.

‘सीएमआरएस’ प्रमाणपत्रासाठी विलंब?

या मार्गावरील ट्रायल रन पूर्ण झाल्या आहेत. तसेच संचालनासाठी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सीएमआरएस पथकाकडून तपासणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेत तडजोड?

मेट्रो स्थानकात प्रवेश करण्यासाठी लिफ्ट, पादचारी पूल, स्थानकातील सरकते जिने आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मेट्रो प्रशासनाची आहे. पण, सध्या या कामांना विलंब होत आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार घाईगडबडीने काम करताना दिसत आहेत. पण, ही कामे पूर्ण करताना प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केल्यास भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मी रोज सकाळी शिवाजीनगरहून हिंजवडीला कामासाठी जात आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीने हैराण केले आहे.

किमान दीड तास तरी वाहतूक कोंडीत जातो. काम आठ तासांचे आणि येता-जाता कोंडीत ४ तास जात आहेत. मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून कधी पूर्ण होते आणि सेवा कधी सुरू होते, याची आतुरतेने वाटत पाहत आहे. कधी या त्रासातून आमची सुटका होईल, माहीत नाही.

- सिद्धार्थ जगताप, आयटीयन्स

मेट्रोचा प्रवास

  • ९ फेब्रुवारी २०१८ : राज्य मंत्रिमंडळाची ''पीपीपी'' तत्त्वावर प्रकल्प राबविण्यास मान्यता.

  • १८ जुलै २०१८ : राज्य शासनाकडून ''अत्यंत महत्त्वाचा नागरी वाहतूक प्रकल्प'' म्हणून घोषित

  • ८ डिसेंबर २०१८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन.

  • २१ सप्टेंबर २०१९ : सवलत करारावर स्वाक्षरी.

  • २५ नोव्हेंबर २०२१ : प्रत्यक्ष कामाला सुरुवात.

दोनदा मुदतवाढ

मार्च २०२५

  • हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाला मूळ मुदत मार्च २०२५ पर्यंतची होती.

  • भूसंपादन, विविध परवानग्या आणि जागेचा ताबा मिळण्यातील अडचणींमुळे प्रकल्पास विलंब

मार्च २०२६

  • प्रकल्पाला मुदतवाढ देत ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली.

  • पहिली मुदतवाढही संपली आहे.

जून २०२६

  • १५ जून महिना उजाडला तरी दुसऱ्या मुदतीत मेट्रो सेवेत दाखल झाली नाही.

  • नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

  • मेट्रो प्रवासाचे स्वप्न लांबत चालले आहे.

मेट्रो सुरू करण्याचे मुहूर्त

  • मार्च २०२५

  • सप्टेंबर २०२५

  • डिसेंबर २०२५

  • मार्च २०२६

  • मे २०२६

  • १५ जून २०२६

मेट्रोची कामे ‘सीएमआरएस’च्या निकषानुसार पूर्ण केली जात आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर ‘सीएमआरएस’चे पथक तपासणी करणार आहे. त्यानंतर सेवा लवकरच सुरू होईल. मेट्रोच्या कामांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही.

- योगेश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए

तुमचे मत मांडा

शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो सेवेला पाच वेळा मुहूर्त जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही या सेवेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.