Apurva Nemlekar on Pranit More: प्रणित मोरे (Pranit More) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोमध्ये केलेल्या एका प्रेक्षकाच्या महिलांबाबत केलेल्या अपमानास्पद बोलण्यामुळे चर्चेत आहे. '370 रुपयांची बिर्याणी, खाऊ घातली, आता ती वसूल तर करणारच' म्हणत सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा तर ओलांडल्याच, पण त्याहीपेक्षा अधिक वाईट म्हणजे शोचा होस्ट आणि स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने त्याच्या बोलण्याला न रोखता जवळपास अर्धा तास वेळ दिला. नंतर या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर प्रणितला जाहीर माफी मागावी लागली. आक्षेपार्ह बोलणाऱ्या 'हिमांशू जांगडा' या तरुणाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हिमांशूच्या अनेक क्लिप्स सध्या व्हायरल होत आहेत. या प्रकारावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अलिकडेच रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने बिर्याणी वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
अपूर्वा नेमळेकर प्रणित मोरेच्या व्हायरल बिर्याणी वादावर स्पष्टच म्हणली ' प्रणीत मोरेच्या शोमधील एक व्हायरल क्लिप नुकतीच पाहिली आणि मला अक्षरशः घृणा वाटली. एका व्यक्तीने डेटनंतर ‘वसुली’साठी आपल्या जोडीदारावर जबरदस्ती केल्याची गोष्ट अभिमानाने सांगितली, आणि समोर बसलेली तथाकथित ‘पुरुषांची’ गर्दी त्यावर हसत होती! ही कुठल्याच प्रकारे ‘डार्क कॉमेडी’ नाही. ही जबरदस्ती आणि हक्क गाजवण्याच्या मानसिकतेचं लाजिरवाणं उदाहरण आहे. त्या प्रेक्षकांमध्ये बसून हसणारे लोक पुरुष नाहीत; ते समाजावरचं ओझं आहेत. प्रेक्षक म्हणून आपण जागं होण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मनोरंजन म्हणजे काय, याची जाणीव ठेवून निवड केली पाहिजे. अशा टॉक्सिक लोकांना व्यासपीठ देणं आणि त्यांना सोशल मीडिया स्टार बनवणं थांबवलं पाहिजे. त्यांना जाब विचारा आणि त्यांच्यावर बंदी घाला.: असं ती म्हणाली.

गेल्या आठवड्यात प्रणित मोरेच्या शोमधील एका क्लिपची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली. बिर्याणी वाद निर्माण होण्यापूर्वी हिमांशू जांगडा कुणाला माहीत असण्याचा कारण नाही. मात्र, या सगळ्या बिर्याणी वक्तव्य प्रकारानंतर असमवेदनशील वक्तव्यामुळे ट्रोल झालेल्या या प्रेक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. या संदर्भात त्या तरुणाच्या बॉसने व्हिडिओ करत माहिती दिली. या व्हिडिओनंतर ज्या कंपनीत तो काम करायचा, त्या कंपनीच्या बॉसला ऑफिसमधील अनेकांचे कॉल आले. ई-मेलही आले. त्यानंतर कंपनीतील कर्मचारी, त्यांचे क्लायंट यांना फरक पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर इतकं असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं.