Yeola News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची शेततळ्यात उडी; पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल, दोघे ताब्यात
esakal June 11, 2026 10:45 PM

येवला - चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी होत असलेल्या कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून वाघाळे (ता. येवला) येथील एका विवाहितेने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पती, सासरे आणि सासू यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वैशाली नामदेव नवले (वय-२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील शरद निकुळे (रा. सोयगाव, ता. नांदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशालीचा विवाह जून २०२३ मध्ये नामदेव मारुती नवले (रा. वाघाळे) याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर शेतीच्या कामांसाठी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येऊ लागली. या मागणीवरून पती नामदेव नवले, सासरे मारुती नवले आणि सासू विमलबाई नवले यांनी वैशालीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या त्रासाबाबत वैशालीने वारंवार माहेरी माहिती दिली होती. छळ असह्य झाल्याने ती काही काळ माहेरीही राहिली होती. मात्र नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर ती पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली होती.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ९ जून रोजी शरद निकुळे हे कामानिमित्त कोपरगाव येथे गेले असताना वैशालीने पतीच्या मोबाईलवरून फोन करून सासरच्या मंडळींकडून चारचाकीसाठी तीन लाख रुपयांची मागणी होत असल्याचे सांगितले. त्यावर ‘सध्या एवढी रक्कम उपलब्ध नाही; मात्र शक्य झाल्यावर मदत करीन,’ असे त्यांनी तिला सांगितले होते.

दरम्यान, बुधवारी (ता. १०) सकाळी जावई नामदेव नवले याचा फोन आला. वैशाली शेततळ्यात पडल्याने तिला उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असल्याचे त्याने सांगितले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैशालीचा मृत्यू झाला होता.

सासरची मंडळी गेली निघून

विशेष म्हणजे, वैशालीचे वडील आणि नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सासरचे लोक तेथून निघून गेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.