मृतदेहाशी लग्न… सक्षमच्या आईवडिलांचं काय चाललंय?; नांदेड केसची मोठी अपडेट समोर
Tv9 Marathi June 13, 2026 04:45 PM

आपल्या मुलीचं सक्षम याच्यासोबत अफेअर आहे, असं कळताच आंचल हिच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून 19 वर्षीय सक्षम याची हत्या केली. 25 नोव्हेंबर 2025 रोजी सक्षम याने अखेरचा श्वास घेतला आणि त्याच्याच मृतदेहाशी आंचल हिने लग्न केलं. रिपोर्टनुसार, लग्नाबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने सक्षमला घरी बोलावल्याचा आरोप मुलीचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश व साहिल यांच्यावर आहे. त्यांनी पाहुण्याप्रमाणे त्याला चहा दिला, पण त्यानंतर गोळी झाडून आणि डोक्यावर दगड मारून त्याची हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.

जेव्हा आंचल हिने दिलेलं वचन…

सक्षम याच्या मृत्यूनंतर सर्वात जास्त चर्चेत आली आंचल हिचे काही फोटो आणि व्हिडीओ, ज्यामध्ये ती, सक्षम याच्या मृतदेहावर ढसाढसा रडताना दिसली… आंचल हिने सक्षम याच्या मृतदेहासोबत लग्नच्या सर्व विधी पूर्ण केल्या. सक्षम याचा मृतदेह घरी आणल्यानंतर दोघांच्या शरीराला हळद लावण्यात आली. आंचल हिने स्वतःच्या कपाळावर सक्षम याच्या नावाचा कुंकू लावला…

आंचल म्हणालेली, सक्षम आता या जगात नसला तरी, त्याच्या आई – वडिलांसोबत आता मी त्यांचा मुलगा म्हणून राहणार आहे. आंचल हिने तिचे वडील आणि भावांवर सक्षम याच्या हत्येचे आरोप केले आणि त्यांना मृत्यूची शिक्षा मिळाली पाहिजे… अशी मागणी केली. पण जवळपास 6 ते 7 महिन्यांनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे.

सक्षम याच्या घरातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.आंचल हिने वचन दिलं होतं, सक्षम याच्या आई – वडिलांना कधीच सोडून जाणार नाही, पण ती आता घर सोडून गेली आहे. सक्षम याची आई संगीता ताटे यांनी सांगितल्यानुसार, ‘एके दिवशी अचानक आंचल हिच्या आजीची प्रकृती ठिक नाही असा फोन आला. तिला आजीला भेटायला जायचं होतं. आंचल हिचं माहेर आमच्या घरापासून लांब नाही. आंचल त्या दिवशी गेली, त्यानंतर परत आलीच नाही.’

‘आंचल हिच्यावर मी कधीच कोणत्या गोष्टीसाठी दबाव टाकला नाही. तिच्या कुटुंबियांसोबत ती फोनवरून संपर्कात होती… पण आजीच्या घरी गेल्यानंतर तिने ताटे कुटुंबासोबत सर्व संबंध मोडले आहेत.. आता आंचल माझ्या संपर्कात नाही…’ असं देखील संगीता ताटे यांनी सांगितलं आहे.

सक्षम याच्या वडिलांचं निधन

याच दरम्यान, सक्षम याच्या वडिलांचा प्रकृती देखील खालावली. मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का त्यांना लागला. याच कारणामुळे त्यांना BP चा आजार झाला. 3 महिन्यांपूर्वी सक्षम याच्या वडिलांचं देखील निधन झालं. एका वर्षात मुलगा आणि पतीला गमावल्यानंतर आणि आंचल हिने देखील घर सोडल्यानंतर संगीता ताटे पूर्णपणे एकट्या पडल्या आहेत. त्यांना सतत मुलाची आठवण सतावते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.