Murlidhar Mohol : मोदी सरकारने १२ वर्षांत विकास पाया भक्कम केला; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
esakal June 15, 2026 08:45 PM

पुणे - स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त २०४७ मध्ये विकसित भारत घडविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याचा भक्कम पाया गेल्या १२ वर्षाच्या कामातून रचला गेला आहे. लोकउपयोगी योजनांपासून ते पायाभूत सुविधांचा विकासावर मोदी सरकारने भर दिला.

काँग्रेसच्या काळात मूलभूत विकासापासून देशातील नागरिक वंचित होते. पण वीज, पाणी, आरोग्य, दळवळण या सेवा ग्रामीण भागापर्यंत पोचविण्यात मोदी सरकारला यश आले आहे. जगभरात भारताचे स्थान अधिक मजबूत केले आहे, असे केंद्रीय नागरी विमानसेवा व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी सलग १२ वर्ष पंतप्रधानपद भूषविले आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासूनचे हे एकमेव पंतप्रधान आहेत. यानिमित्त भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि शेखर वढणे उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, २०१४ मध्ये जनतेने भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने देशात विकासाला गती मिळाली. भारताची अर्थव्यवस्था जगातील ११व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचली असून महागाई दर नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. विविध कल्याणकारी योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळाला असून ८० टक्के जनतेला मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. लोककल्याणकारी योजनांमधून आत्तापर्यंत ५१ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे विद्युतीकरण, वंदे भारत गाड्या, मेट्रो जाळ्याचा विस्तार, जनधन योजना आणि डिजिटल पेमेंटमुळे देशाच्या विकासाला वेग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रात भारत निर्यातदार देश बनला असून सहकार मंत्रालयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे.

पुण्याबाबत बोलताना त्यांनी ५६ किलोमीटर भुयारी मार्ग, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो, विमानतळ विस्तार आणि एक हजार ई-बस प्रकल्पांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असल्याचे सांगितले. पुण्याचे विमानतळ देशातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. आगामी काळात खडकवासला ते हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड ते लोहगाव विमानतळ मेट्रोने जोडले जाणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

मोदी सरकारची प्रमुख कामे

- अर्थव्यवस्था ११व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर

- महागाई दर नियंत्रणात ठेवण्यात यश

- ५१ लाख कोटींचे डीबीटी हस्तांतरण

- ८० टक्के जनतेला मोफत धान्य लाभ

- राष्ट्रीय महामार्ग बांधकामात तिप्पट वाढ

- रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण

- २३ शहरांपर्यंत मेट्रो जाळ्याचा विस्तार

- ७४ वरून १६५ विमानतळांची वाढ

- जनधन व डिजिटल पेमेंटची क्रांती

- संरक्षण साहित्य निर्यातीत विक्रमी वाढ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.