MP Murlidhar Mohol : वारकऱ्यांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही; सर्व कामे तातडीने पूर्ण करा
esakal June 16, 2026 01:45 AM

पुणे - श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे ९ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. त्यापूर्वीपासून पुण्यात लाखो वारकरी वास्तव्यास असतात. त्यांना चांगले रस्ते, पाणी, आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. यात गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. सर्व कामे वेळेत पूर्ण करा, अशी तंबी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिली आहे.

महापालिका, पोलिस, पाणीपुरवठा, मलनिःसारण, आरोग्य, विद्युत आणि घनकचरा व्यवस्थापन विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या पाहणीत पालखी मार्गावरील प्रत्येक सुविधेचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, आमदार हेमंत रासने, आयुक्त नवलकिशोर राम आदी नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय, हडपसर क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणच्या सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष नियोजनाबाबत रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा याबाबत सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत व स्वच्छता विषयक कामे करणेसंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले, गटारे, चेंबर्स आणि कल्व्हर्टची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. पालखी मार्गावरील धोकादायक चेंबर्सवर लोखंडी जाळी बसविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पालखी मार्गावर वाहतुकीचा अडथळा होणार नाही यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन करावे, तसेच बेवारस वाहने आणि अडथळे तातडीने हटवावेत, असे निर्देश देण्यात आले. विद्युत पुरवठा अखंडित ठेवून संपूर्ण मार्गावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.

आषाढी वारीसाठी प्रशासनाची तयारी

* वारकऱ्यांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

* पालखी मार्गावरील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

* नाले, गटारे, चेंबर्सची युद्धपातळीवर साफसफाई

* धोकादायक चेंबर्सवर लोखंडी जाळी बसविणार

* रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे आणि अडथळे हटविणार

* २४ तास स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन व्यवस्था

* वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा

* मोबाईल टॉयलेट्स आणि विश्रांती कक्ष उभारणार

* फिरते दवाखाने व आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध

* सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती

* पालखी मार्गावर अखंडित वीज आणि प्रकाशव्यवस्था

* वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पोलिस नियोजन

* मुक्कामस्थळांवर पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा

* पालखी मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी

* सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.