जयपूरमध्ये आंदोलनात तरुणाकडून हल्ला; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट प्रत्युत्तर देत राजीनाम्याची पुन्हा मागणी
esakal June 16, 2026 01:45 AM

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये एका तरुणाने कानशिलात लगावली. यावर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले की, शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहे. ते शांततेने आपला आवाज उठवत राहतील, असे त्यांनी सांगितले. आपण गांधी आणि आंबेडकरांचे अनुयायी असून शांतता आणि प्रेमाने आपला लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या आपल्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, "एका घाबरलेल्या आणि भ्रष्ट राजाची गुंडांची फौज हेच करू शकते. हे तेच लोक आहेत जे नीटसारख्या परीक्षांचे पेपर फोडून लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतात आणि आता जेव्हा देशातील तरुण शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तेव्हा हे त्यांच्यावरच हल्ला करत आहेत. हे अत्यंत भ्याडपणाचे कृत्य आहे."

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

आंदोलनापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, "जर भारताच्या सरन्यायाधीशांनी 'कॉकरोच' हा शब्द वापरला नसता, तर हे आंदोलन सुरू झाले नसते. मी भारताच्या सरन्यायाधीशांकडे जाऊन त्यांना 'कॉकरोच' हा शब्द वापरायला सांगितला, असे नाही. मला वाटते की, या देशातील तरुणांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. आपल्या देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ४० वर्षांतील सर्वाधिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात अशी एकही सरकारी परीक्षा शिल्लक राहिलेली नाही, जिचा पेपर फुटत नाही. जिथे परीक्षा घेतली जाते, तिथेही निकाल यायला एक-दोन वर्षे लागतात. तोपर्यंत या देशातील तरुण काय करणार?"

Black Money: काळा पैसा भारतात माघारी येणार! केवळ पंधरा दिवसांचा अवधी, परदेशी संपत्तीबाबत सरकारचं मोठं पाऊल

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पक्षाने आंदोलन केले. या आंदोलनामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. याशिवाय, हुतात्मा स्मारकाजवळील आंदोलनादरम्यान अनेक लोकांचे खिसे कापण्यात आले. सीजेपीच्या आंदोलनादरम्यान अनेक लोकांचे मोबाईल फोन आणि पाकिटे चोरीला गेली. पोलिसांनी चोरीप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. एवढेच नाही तर, कॉकरोच जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक माध्यम प्रतिनिधींवर हल्ला केला आणि त्यांना वाईट वागणूक दिली. पक्षाचे कार्यकर्ते अनेक प्रसंगी आपापसातही भिडले आणि अनेकदा त्यांच्यात सार्वजनिक ठिकाणी हाणामारी झाली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.