FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?
esakal June 16, 2026 01:45 AM

देऊळगाव राजा (बुलढाणा) : तालुक्यातील देऊळगाव मही येथील एका किराणा दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुमारे ५४ हजार रुपयांच्या गुटखा पुड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव मही येथून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा येथील अधिकाऱ्यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील जनता किराणा दुकानावर पंचांसमक्ष छापा टाकला.

यावेळी दुकानात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या आणि मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटखा पुड्यांचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे (वय २५), अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून तौफिक खान सलीम खान (रा. देऊळगाव मही) आणि इकबाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तौफिक खान याला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणी अद्याप मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! गुन्हेगारांवर लागणार मकोका; प्रतिबंधित पदार्थांची पाळंमुळं नष्ट करण्याचा निर्धार

यापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटका विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, असं असताना याप्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. याप्रकणी मकोका लावण्यात पोलीस टाळाटाळ करत आहेत का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी विचारलं असता, तपासानंतर मकोका लावण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात गावात अफवांना उधाण

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे गुटखा व प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात देऊळगाव राजा शहरातील एका दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात एफडीएतर्फे अशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.