तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा धक्का.
Marathi June 16, 2026 04:25 AM

नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पक्षात प्रवेशले 20 खासदार

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगाल राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात आता लोकसभेतही उभी फूट पडली आहे. या पक्षाच्या 28 लोकसभा खासदारांपैकी 20 खासदारांनी अपरिचित अशा ‘नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पक्षा’त प्रवेश केला आहे. हा पक्षाची नुकतीच केद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे. हा पक्ष आता केंद्रात सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारला समर्थन देणार आहे. त्यामुळे लोकसभेतील या आघाडीचे संख्याबळ वाढणार आहे.

रविवारी या असंतुष्ट 20 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी तीन तास चर्चा केली होती. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडण्याची इच्छा या खारसदारांनी व्यक्त केली होती. या निर्गमनाच्या कायदेशीर परिणामांवर आम्ही आधी परस्परांमध्ये व्यापक विचार विमर्श केला असून नंतर या पक्षाला विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी स्पष्ट केले आहे.

या पक्षाची निवड का…

घटनेच्या 10 व्या परिशिष्टात असणाऱ्या पक्षांतर बंदी कायद्याच्या कक्षेत न येण्यासाठी या खासदारांनी नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या पक्षातील दोन तृतियांश किंवा अधिक लोकसभा सदस्य फुटले, तर त्यांना त्वरित अन्य कोणत्यातरी नोंदणीकृत पक्षात समाविष्ट व्हावे लागते. अन्यथा त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले जाते. हाच नियम विधानसभा आणि राज्यसभेतील संबंधित पक्षाच्या सदस्यांनाही लागू आहे. अशा प्रकारे दोन तृतियांश लोकप्रतिनिधींनी एखाद्या नोंदणीकृत पक्षात प्रवेश केल्यास त्यांचे सभागृह सदस्यत्व अबाधित राहते, असे या परिशिष्टात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

एनसीपीआय कडून स्वागत

‘नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ किंवा एनसीपीआय असे तृणमूल काँग्रेसच्या असंतुष्ट खासदारांनी प्रवेश केलेल्या पक्षाचे पूर्ण नाव असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी झालेली आहे. मात्र, तो मान्यताप्राप्त पक्ष नाही. त्या पक्षाची स्थापना पश्चिम बंगालच्याच काही लोकांनी केली आहे. या पक्षाने पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाग घेतलेला आहे. तथापि, या पक्षाला मिळालेली मते अत्यल्प आहेत. या पक्षाच्या युवा शाखेचे सचिव तितास भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसच्या असंतुष्ट खासदारांचे आपल्या पक्षात स्वागत केले आहे. या खासदारांच्या निर्णयाची आम्हाला माहिती नव्हती. हा निर्णय समजल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. आमचा पक्ष कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. त्याचे अनेक सहसंस्थापक आहेत. मात्र, आम्ही या खासदारांचे आमच्या पक्षात स्वागत करीत आहोत. त्यांच्या आगमनामुळे पक्षाचे सामर्थ्य वाढले आहे, असे प्रतिपादन भट्टाचार्य यांनी केले.

तृणमूल काँग्रेसचे अस्तित्व डळमळीत

असंतुष्ट खासदारांचा अन्य पक्षातील प्रवेश बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसकडून व्यक्त झाली आहे. या प्रवेशाला कायदेशीर आव्हान देण्याचा आम्ही विचार करीत आहोत, असेही या पक्षाच्या काही नेत्यांनी स्पष्ट केले. तथापि, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्यातील या पक्षाच्या बव्हंशी लोकप्रतिनिधींचे बहिर्गमन झाल्याने मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाचे अस्तित्व डळमळीत झाल्याचे दिसून येते. या पक्षातून आणखी बहिर्गमन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. येत्या दोन आठवड्यांमध्ये स्थिती स्पष्ट होईल, असे तज्ञांचे मत आहे. असंतुष्ट खासदारांना वेगळा गट म्हणून बसण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्यांना पत्र पाठवून केली होती. तथापि, आता या खासदारांनी वेगळा गट स्थापन न करता अन्य नोंदणीकृत पक्षात प्रवेश केल्याने त्यांची समस्या सुटल्याचेही काहींचे मत आहे.

कोणत्या खासदारांचा प्रवेश

  1. सुदीप बंदोपाध्याय, 2. रचना बॅनर्जी, 3. जगदीश चंद्र बर्मा बसुनिया, 4. पार्थ भौमिक, 5. अबू ताहेर खान, 6. युसूफ पठाण, 7. खलीलुर रहमान, 8. माला रॉय, 9. बापी हरधर, 10. शताब्दी रॉय, 1. हरलभ कुमार, 1. हरलभ कुमार, 1. 13. डॉ. शर्मिला सरकार, 14. कालीपाद शरण खेरवाल, 15. प्रसून बंदोपाध्याय, 16. दीपक देव अधिकारी, 17. सयोनी घोष, 18. माला रॉय, 19. जून मालिया, 20. अरुप चक्रवर्ती, अशी या खासदारांची नावे आहेत.

प्रकरण न्यायालयात जाणे शक्य….

ड खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता

ड तृणमूल काँग्रेसमधून आणखी लोकप्रतिनिधी आगामी काळात बाहेर पडणार

ड ममता बॅनर्जी यांच्याकडून त्यांच्या पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.