पुणे - केसनंद (ता. हवेली) येथील भागात व्यापारी आणि निवासी गृहप्रकल्पात सदनिका देण्याचे आमिष दाखवून सुमारे दीडशे ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक समीर रवींद्र जैन (रा. मार्केटयार्ड, पुणे) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ‘रविनंदा टॉवर्स एओपी’चे चेअरमन सुखजितसिंग निर्मलसिंग सैनी (रा. शुक्रवार पेठ) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जैन याने जुलै २०१५ मध्ये केसनंद येथील शेतकरी आणि जमीन मालकांसमवेत सहभागीदारी (जॉईन्ट व्हेंचर) करार केला होता.
जिल्हाधिकारी आणि ‘पीएमआरडीए’कडून मंजुरी घेऊन पाच वर्षांत व्यापारी आणि निवासी प्रकल्प बांधण्याचे आश्वासन त्याने दिले होते. त्याअनुषंगाने दीडशे खरेदीदारांकडून सुमारे ५० कोटी रुपये गोळा करण्यात आले. मात्र, २०१८ पासून आजतागायत ग्राहकांना सदनिका न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन खांदारे करत आहेत.