France vs Senegal Fifa World Cup 2026 Marathi News: किलियन एमबापेने ( Kylian Mbappe ) दोन सोपे प्रयत्न गमावल्यानंतर अखेर फ्रान्ससाठी विजयी गोल केला. मात्र, मुंबईपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या सेनेगल संघाने गत उपविजेत्या आणि २०१८च्या विजेत्या संघाला चांगलेच झुंजवले होते. पण, पहिल्या हाफमध्ये रटाळ खेळ करणाऱ्या फ्रान्सने मध्यंतरानंतर गती पकडली अन् एमबापेच्या २ गोलच्या जोरावर ३-१ अशी बाजी मारली. एमबापेने या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी ( Lionel Messi) याच्यासह आणखी दोन विक्रम मोडले. तो फ्रान्सकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय आणि सर्वाधिक वर्ल्ड कप गोल करणारा खेळाडू ठरला.
सेनेगल संघाने २००२ मध्ये आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात बलाढ्य फ्रान्सवर १-० असा विजय मिळवून जगाला दखल घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या आफ्रिकन देशाला हलक्यात कुणी घेतले नाही. आपला चौथा वर्ल्ड कप खेळायला मैदानावर उतरलेल्या सेनेगलने २००२ च्या आठवणी ताज्या केल्या. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोलजाळीवर हल्ला करताना सेनेगलने गतउपविजेत्यांना आक्रमकता काय असते हे दाखवून दिले. पण, या सामन्यात सर्वांचे लक्ष लागलेले, ते किलियन एमबापे याच्यावर...
फ्रान्सकडून बुधवारी मध्यरात्री सुरुवातीच्या २५ मिनिटात फार आक्रमक खेळ झाला नाही, परंतु जॅक्सनचा सेनेगलचे खाते उघडणारा प्रयत्न थोडक्यात हुकला. थोड्यावेळासाठी फ्रान्सच्या चाहत्यांच्या मनात धडकी भरली होती. ६ मिनिटांच्या भरपाईच्या शेवटच्या क्षणाला मानेने सेनेगलसाठी गोल ताटात वाढून दिला होता, परंतु गोलजाळीच्या अगदी समोरच मिळेलली संधी इस्मैला याला साधता आली नाही आणि सेनेगलने आघाडीची सोपी संधी गमावली. पण, पहिल्या हाफमध्ये सेनेगलने वर्चस्व गाजवले आणि त्यांच्याकडून गोलचे पाच प्रयत्न झाले. तेच फ्रान्सला एकच प्रयत्न करता आला, एमबापेच्या पायाशी चेंडू फार कमी वेळाच राहिला. त्याचा पाय चेंडूला फक्त १४ वेळा लागला.
मध्यंतरानंतर फ्रान्सकडून पहिले आक्रमण झाले अन् डोयूने तुडवलेला चेंडू गोलजाळीच्या अगदी जवळून गेला. दोन्ही संघांकडून काही सुरेख टॅकल पाहायला मिळाले आणि ५३ व्या मिनिटाला फ्रान्सचा आघाडीचा प्रयत्न थोडक्यात हुकला. ओलिसेला रोखण्यासाठी सेनेगलचा गोलरक्षक पुढे सरसावला अन् चेंडू गोलजाळीच्या वरून बाहेर गेला. चार मिनिटानंतर एमबापेचा प्रयत्न गोलरक्षक एडोअर्ड मेंडीने अडवला. ६०व्या मिनिटाला माने याने पेनल्टी क्षेत्रात एमबापेला पाडले अन् फ्रान्सकडून पेनल्टीची मागणी झाली. पण, पंचांनी VAR मध्ये पाहून पेनल्टी नाकारली.
६४व्या मिनिटाला एमबापेला सुवर्णसंधी मिळालेली, त्याच्या अन् गोलजाळीच्या मध्ये फक्त गोलरक्षक होता, परंतु फ्रान्सच्या कर्णधाराला चेंडूवर नियंत्रण राखता आले नाही. पण, ओलिसेच्या पासवर ६६व्या मिनिटाला एमबापेने विक्रमी गोल करून फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि त्याने फ्रान्सकडून सर्वाधिक ५७ गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याशिवाय त्याने फ्रान्सकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १३ गोल करणाऱ्या जस्ट फॉन्टाईनच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कपमध्ये १३ गोलच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली, परंतु मेस्सीला त्यासाठी २६ सामने खेळावे लागले, तर एमबापेने १५ सामन्यांत हा पराक्रम केला. हे दोघंही वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १६ गोल करणाऱ्या मिरोस्लाव्हा क्लोसच्या विक्रमाच्या जवळ आहेत.
६८ व्या मिनिटाला सेनेगलच्या जॅक्सनने केलेला भन्नाट गोल ऑफ साईडमुळे नाकारला गेला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या ब्रॅडली बार्कोलाने ८२ व्या मिनिटाला सुरेख गोल करून फ्रान्सची आघाडी २-० अशी मजबूत केली. ९० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला सेनेगलकडून इब्राहिम एमबापेने गोल केला आणि पिछाडी १-२ अशी कमी केली. पण, त्याला पुढच्याच मिनिटाला एमबापेने गोल करून फ्रान्सचा ३-१ असा विजय पक्का केला आणि दोन वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केले. त्याने फ्रान्सकडून सर्वाधिक ५८ गोलचा विक्रम नावावर करताना ऑलिव्हर जिरूडचा ( ५७) मागे टाकले, तर फ्रान्ससाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १३ गोलचा ( जस्ट फॉन्टाईन) विक्रमही मोडला. दुसऱ्या गोलसह त्याने मेस्सीचा १३ गोलचा विक्रमही मोडला.