सुनील जगताप
उरुळी कांचन : कृषी-सौरऊर्जेला बळ देण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था तिरुवनंतपुरम,केरळ (CSIR-NIIST) आणि बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान (बायफ) उरुळी कांचन यांनी संयुक्त संशोधन व तंत्रज्ञानासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. उरुळी कांचन येथील बायफच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रावर हा सामंजस्य करार(MoU)संपन्न झाला.बायफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.भरत काकडे आणि सीएसआयआर-एनआयआयएसटीचे संचालक डॉ.सी.आनंदरामकृष्णन यांच्यात कराराची देवाणघेवाण झाली.शाश्वत विकासासाठी संशोधन,नावीन्य,तंत्रज्ञान पडताळणी व क्षमता बांधणी या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.शाश्वत शेती,नवीकरणीय ऊर्जा व ग्रामीण परिवर्तनासाठी नावीन्यपूर्ण उपायांना गती देणारा हा ऐतिहासिक करार मानला जात आहे.
कृषी + सौरऊर्जा या भागीदारीचा मुख्य फोकस "अॅग्रिव्होल्टेइक्स" या नवीन तंत्रज्ञानावर असेल. यात शेतीसोबतच सौरऊर्जा निर्मिती होते. सीएसआयआर-एनआयआयएसटीने स्मार्ट सोलर पॅनल रचना व प्रगत प्रकाश-व्यवस्थापनाद्वारे शेतपिकांचे उत्पादन वाढवणारी तंत्रे विकसित केली आहेत.यामुळे जमिनीचा कार्यक्षम वापर,पिकांसाठी अनुकूल सूक्ष्म हवामान,पाण्याची बचत आणि हवामान बदलास प्रतिरोधक शेती होणार आहे.भारतातील अॅग्रिव्होल्टेइक्स मध्ये काम करणारी बायफ ही अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे.बायफने विविध सौरपॅनल रचनांचा शेतपिकांवर होणारा परिणाम यावर शेतपातळीवर मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत.
इतर सहकार्याची क्षेत्रे दोन्ही संस्था देशातील विविध कृषी-हवामान प्रदेशांमध्ये अॅग्रिव्होल्टेइक्स पद्धतीची शेतावर चाचणी,प्रात्यक्षिके आणि मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करतील.डॉ.आनंदरामकृष्णन यांनी बायफच्या प्रयोगशाळा व शेतीप्रात्यक्षिकांना भेट दिली.यावेळी व्हेगन लेदर तंत्रज्ञान,हरित तंत्रज्ञान,सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया व पुनर्वापर,कृषी कचरा व्यवस्थापन,बायोमास उपयोजन,एआय (AI)आधारित ड्रोन तंत्रज्ञान तसेच कचऱ्यापासून संपत्ती -बायोडिग्रेडेबल प्लास्टिक,इको-फ्रेंडली पॅकेजिंग,कृषी मल्च,बायोडिग्रेडेबल कटलरी अशा विषयांवरही सहकार्य करण्याचे ठरवले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे तांत्रिक कौशल्य आणि बायफचा ग्रामीण विकास व शाश्वत शेतीचा अनुभव एकत्र येऊन स्वच्छ ऊर्जा,हवामान-स्मार्ट शेती,संसाधन कार्यक्षमता आणि ग्रामीण उपजीविका यासाठी उपयुक्त तंत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातील.भारताच्या शाश्वतता, चक्रीय अर्थव्यवस्था व हवामान कृती उद्दिष्टांना याचा मोठा हातभार लागेल.
या कराराच्या वेळी बायफचे उपाध्यक्ष डॉ.जयंत खडसे,कार्यक्रम संचालक प्रमोद ताकवले, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आदर्श अशोक तसेच दोन्ही संस्थांचे शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित होते.