Bullet Train : बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पुढील वर्षी! पुणे-मुंबई प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
esakal June 18, 2026 03:45 AM

पुणे - मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील वर्षी कार्यान्वित होणार असून, मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. आता देशाकडे बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे स्थानकावर बुधवारी (ता. १७) रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या हस्ते पुणे - शिर्डी एक्सप्रेस, तर हडपसर स्थानकावर हडपसर - दाणापूर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाशी जोडले होते.

वैष्णव म्हणाले, ‘पुणे स्थानकाची क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केवळ पुणे स्थानक नाही तर पुण्याच्या जवळ असणाऱ्या स्थानकांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याच्या जवळ असलेल्या आळंदी स्थानकावर ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ बांधले जाणार आहे. यामुळे भविष्यात पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वेच्या संख्येत वाढ होईल, शिवाय पुणे स्थानकावरचा ताणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.’

काय म्हणाले अश्विनी वैष्णव

  • पुणे व उपनगरीय स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, येत्या १००० दिवसांत (साधारण ३ वर्षांत) हे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • आळंदी कोचिंग टर्मिनलसाठी सुमारे ७०० कोटी रुपयांच्या खर्च.

  • पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट तयार केले जाणार.

  • जुन्या ‘आरआरआय’ सिग्नल यंत्रणेच्या जागी अद्ययावत ‘डिजिटल कंट्रोल प्रणाली’चा वापर.

  • पुणे स्थानकावर प्रवेशासाठी तिसरा नवीन प्रवेशद्वार

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास ४८ मिनिटात

  • मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि पुणे ही ‘ट्विन सिटीज’ बनतील. या दोन शहरांमधील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांवर येईल.

  • सुरुवातीला मुंबई -पुणे दरम्यान दर एका तासाने बुलेट ट्रेन धावेल. नंतर ही वारंवारता १५ ते ३० मिनिटांवर आणली जाईल.

  • पुणे ते हैदराबाद हा प्रवास बुलेट ट्रेनमुळे अवघ्या २ तास ८ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

  • पुणे-मुंबई दरम्यान असलेल्या पुणे ते लोणावळा व कर्जत ते मुंबई दरम्यान तिसरी व चौथी मार्गिकेचे काम लवकरच सुरू होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.