Portugal vs Congo DR Marathi Football Fifa News: पोर्तुगाल विरुद्ध काँगो डीआर यांच्यातल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला हाफ चुरशीचा राहिला.. सहाव्या मिनिटाला पोर्तुगालने घेतलेल्या आघाडीला काँगोकडून भरपाईवेळेच्या शेवटच्या सेकंदाला प्रत्युत्तर मिळाले. काँगोचे ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ध्येय साकार झाले आहे, कारण योआने विसाने उंच उडी मारून एक जोरदार हेडर गोलकीपर डिओगो कोस्टाच्या आवाक्याबाहेर मारला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.
पोर्तुगाल विरुद्ध काँगो डीआर सामन्यात सर्वांचे लक्ष होते, ते ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे... विक्रमी सहावा वर्ल्ड कप खेळणारा रोनाल्डो मैदानावर उतरताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत झाले. किलियन एमबापे, लिओनेल मेस्सी यांनी ज्याप्रकारे वर्ल्ड कप स्पर्धेच्या या हंगामाची सुरूवात केली, तशीच दमदार कामगिरी रोनाल्डोकडून अपेक्षित आहे. ४१ वर्षे आणि १३२ दिवसांचा असताना, ख्रिस्तियानो रोनाल्डो वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सामना सुरू करणारा (गोलरक्षक सोडून) सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
Portugal vs Congo DR : ख्रिस्तियानो रोनाल्डो 'म्हातारा' झाला... सहावा वर्ल्ड कप खेळणाऱ्या सुपरस्टारसोबत नेमकं काय घडलं ते वाचा...रोनाल्डोकडून गोलची अपेक्षा असताना २१ वर्षीय जोआओ नेव्हेसने पोर्तुगालचे खाते उघडले. सहाव्या मिनिटाला नेव्हेसने हेडरद्वारे गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. नेव्हेस (२१ वर्षे, २६३ दिवस) हा वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा तिसरा सर्वात तरुण पोर्तुगीज खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी २००६ मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो (२१ वर्षे, १३२ दिवस) आणि २०२२ मध्ये गोन्कालो रामोस (२१ वर्षे, १६९ दिवस) यांचा क्रमांक लागतो. पहिल्या ४० मिनिटांच्या खेळात चेंडू क्वचितच रोनाल्डोच्या पायाशी घुटमळताना दिसला.पोर्तुगालचे अन्य खेळाडूंनीच चेंडूवर अधिक काळ ताबा राखला होता.
काँगोकडूनही काही चांगले प्रयत्न झाले, परंतु त्यांनी आक्रमणापेक्षा बचावावर अधिक भर दिल्याचे दिसले. त्यामुळेच अनेकदा चेंडू बॉक्समध्ये पोहोचवूनही पोर्तुगालला गोल करता आला नाही. भरपाईवेळेत काँगोकडून बरोबरीचा गोल जवळपास झालाच होता, परंतु, सॅम्युएल मॉटौसॅमीचा प्रयत्न थोडक्यात हुकला. मात्र, चार मिनिटांच्या भरपाई वेळेतील शेवटच्या सेकंदात त्यांनी गोल केला...बॉक्सबाहेरून आलेला चेंडू योआन विस्साने हेडरद्वारे गोलजाळीत पोहोचवला आणि हा काँगोचा वर्ल्ड कप इतिहासातील पहिला गोल ठरला.
त्यांनी १४ जून १९७४ रोजी झायर म्हणून पदार्पण केले होते आणि योआने विसाच्या गोलमुळे त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करण्यासाठी ५२ वर्षे आणि ३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. वर्ल्ड कप इतिहासातील पहिल्या गोलसाठीची ही दुसरी सर्वात मोठी प्रतीक्षा आहे, जी केवळ बोलिव्हियाच्या (६३ वर्षे, १९३० पदार्पण, १९९४ पहिला गोल) मागे आहे.
मध्य आफ्रिकेतील एक प्रमुख देश आहे आणि काँगोची एकूण लोकसंख्या सुमारे ११.६ कोटी आहे. भारताची लोकसंख्या काँगोच्या तुलनेत तब्बल १२.७ पटीने जास्त आहे. एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२.५ कोटी आहे, ही काँगोच्या संपूर्ण देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. काँगो हा जगातील १५ व्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे