Dating Apps Fraud : भास प्रेमाचा, फास पैशांचा! डेटिंग ॲपवरून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
esakal June 18, 2026 03:45 AM

पुणे - आधी डेटिंग ॲपवर सुंदर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करायचे... नंतर सावज शोधून त्याला गोड बोलून वासनेच्या किंवा गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढायचे आणि शेवटी बनावट पोलिस अधिकारी बनून लाखो रुपयांची खंडणी उकळायची. सायबर चोरट्यांकडून शहरात अशा गुन्ह्यांचा आलेख वेगाने वाढत चालला आहे.

एकटेपणा आणि भावनिक आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना शोधून हे सायबर चोरटे त्यांच्याशी काही आठवडे संवाद साधतात. विश्वास संपादन केल्यानंतर वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडिओ किंवा माहिती मिळवून ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो. धक्कादायक म्हणजे, काही वेळातच टोळीतील इतर सदस्य पोलिस किंवा सायबर सेलचे अधिकारी बनून फोन करतात आणि गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून लाखो रुपये उकळतात. अब्रू जाण्याच्या भीतीने अनेक पीडित पोलिसांत जाण्याचे टाळत असल्याचा फायदा हे गुन्हेगार घेत आहेत.

अशी होते फसवणूक

  • आकर्षक महिलांच्या नावाने बनावट प्रोफाइल बनवणे

  • संवाद वाढवून खासगी छायाचित्रे किंवा व्हिडिओ मिळवणे

  • बनावट पोलिस अधिकारी बनून गुन्ह्याची भीती दाखवणे

  • ऑनलाइन खंडणी वसूल करणे

फसवणूक टाळण्यासाठी...

  • डेटिंग ॲपवरील व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवून खासगी छायाचित्रे किंवा माहिती शेअर करू नका

  • व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह कृती टाळावी

  • स्वतःला पोलिस अधिकारी सांगणाऱ्याची अधिकृत ओळख आधी पडताळा

  • फसवणूक झाल्यास घाबरून पैसे देऊ नका; तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करा

पुण्यातील काही प्रातिनिधिक घटना

१) डेटिंग ॲपवर मैत्री अन्‌ सात कोटींचा गंडा

सायबर चोरट्यांनी सुंदर तरुणीचे प्रोफाइल तयार करून डेटिंग ॲपद्वारे कोंढव्यातील एका ५३ वर्षीय उद्योजकाशी संपर्क साधला. काही दिवसांतच उद्योजकाचा विश्वास संपादन केला. त्यांना ‘क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग’मध्ये गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवत सात कोटी रुपयांना लुटले.

२) हनीट्रॅपद्वारे फसवणूक

वाघोलीतील एका २७ वर्षीय तरुणाला कोंढव्यात बोलावून ८० हजार रुपयांना लुटले. ही टोळी डेटिंग ॲपवर मुलींचे आकर्षक बनावट प्रोफाइल तयार करायची. तरुणांना रात्री एकांत स्थळी भेटण्यास बोलावत असत. तरुण तेथे पोहोचताच ही टोळी कोयत्याचा धाक दाखवून ऑनलाइन किंवा एटीएममधून जबरदस्तीने पैसे काढून घेत असत.

३) धानोरीत तरुणाचे सेक्सटॉर्शन

डेटिंग ॲपवरून मोबाइल क्रमांक मिळवून व्हिडिओ कॉल केला जातो. कॉल उचलल्यास समोर विवस्त्र तरुणी असते. त्याचा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर मित्रांना पाठवण्याची धमकी दिली जाते. अब्रूच्या भीतीने बरेच जण रक्कम गुन्हेगारांच्या खात्यावर जमा करतात. चोरट्यांनी धानोरीतील एका एमबीए पदवीधर २७ वर्षीय तरुणाकडून अशा प्रकारे दोन लाख ६९ हजार रुपये उकळले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.