परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, बुधवारी (ता. १७) घेतलेल्या आकडेवारीनुसार धरणात केवळ १.७ टीएमसी (१८ टक्के) पाणी साठा शिल्लक आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास धरणाच्या आतमध्ये असलेले जुने ब्रिटिशकालीन वीर धरण उघडे पडण्याची शक्यता आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी १५ मेदरम्यान पावसाला सुरुवात झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी अत्यंत खालावलेली आहे. माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी वीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो. तसेच, पुणे जिल्ह्यातील सासवड व सातारा जिल्ह्यातील लोणंद शहरांना पाणीपुरवठा योजना सुरू असून, अनेक गावच्या पेयजल योजना अवलंबून आहेत.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक छोटे जलाशय असून, त्यांचाही पाणी साठा संपुष्टात आला आहे. धरणातून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.
वीर धरणाच्या पाणीपातळीत २०१९ नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. धरणाच्या दोन्ही कालव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणून उर्वरित पाणीसाठा शिल्लक असल्याचे उपविभागीय अधिकारी राहुल मिसाळ यांनी सांगितले.
यावेळी शाखा अधिकारी स्वरुपा माळी, लक्ष्मण सुद्रिक, सुनील कुंभार, सचिन धुमाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.
नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा टीएमसीत आणि कंसात टक्केवारी
धरण - या वर्षी - गेल्या वर्षी
वीर - १.७ (१८.३७) - ५ (४९.६१)
भाटघर - १.८ (७.८५) - २.१ (७.९४)
नीरा देवघर - १.०(८.६५) - ६.३ (११.८)
गुंजवणी - ०.६ (१७.९३) - ०.९ (२४.५७)