Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल
esakal June 18, 2026 05:45 AM

Portugal vs Congo DR Marathi Football Fifa News: फ्रान्सचा किलियन एमबापे, नॉर्वेचा हालंड अन् अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनेफिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील बुधवारचा दिवस गाजवल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून तशीच अपेक्षा होती. पण, पोर्तुगालच्या सुपरस्टारची पोकळ हवा राहिली. सहावा वर्ल्ड कप खेळण्याचा विक्रम नावावर करणाऱ्या रोनाल्डोला संघासाठी विजयी गोल करता आला नाही. सहकाऱ्यांनी दोन संधी तयारही केल्या होत्या, परंतु रोनाल्डोने त्या गमावल्या. पहिल्या हाफच्या शेवटच्या सेंकदाला मिळवलेल्या बरोबरीच्या गोलने काँगो डीआरचा आत्मविश्वास उंचावला आणि त्यांनी बलाढ्या पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखून, स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवला. ५२ वर्षानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या काँगोने पहिला गोल व पहिला गुण आजच्या सामन्यात कमावला. पोर्तुगालसाठी हा खूप मोठा धक्का आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून गोलची अपेक्षा असताना २१ वर्षीय जोआओ नेव्हेसने पोर्तुगालचे खाते उघडले. सहाव्या मिनिटाला नेव्हेसने हेडरद्वारे गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. नेव्हेस (२१ वर्षे, २६३ दिवस) हा वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा तिसरा सर्वात तरुण पोर्तुगीज खेळाडू ठरला आहे. पण, काँगोकडून चार मिनिटांच्या भरपाई वेळेतील शेवटच्या सेकंदाला प्रत्युत्तर मिळाले.

Portugal vs Congo DR : ख्रिस्तियानो रोनाल्डो 'म्हातारा' झाला... सहावा वर्ल्ड कप खेळणाऱ्या सुपरस्टारसोबत नेमकं काय घडलं ते वाचा...

१९७४ नंतर पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने स्पर्धेतील त्यांचा पहिला गोल नोंदवला. बॉक्सबाहेरून आलेला चेंडू योआन विस्साने हेडरद्वारे गोलजाळीत पोहोचवला आणि पहिल्या हाफमध्ये सामना १-१ असा बरोबरी आणला.

काँगोने दिलेल्या अनपेक्षित धक्क्यानंतर पोर्तुगालने आक्रमक पवित्रा स्वीकारला. ५५ व्या मिनिटाला जोआओ कँसेलोने बटलफ्लाय किकने चेंडू गोलजाळीत पाठवला खरा, परंतु ऑफ साईडमुळे पोर्तुगालचा तो गोल नाकारला गेला. त्यानंतर काँगोकडूनही बाकाम्बूने गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू पोस्टवर आदळून बाहेर गेला.

काँगोलने इथे जवळपास आघाडी घेतली होती. रोनाल्डो आपला २३व्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना खेळतोय आणि या कामगिरीमुळे तो सर्वकालीन यादीत इटलीच्या पाओलो माल्दिनीच्या बरोबरीने चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

पोर्तुगालला गोल शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, कारण काँगोने त्यांची बचावभींत एकदम मजबूत ठेवली होती. ६७व्या मिनिटाला रोनाल्डोने आघाडीची सोपी संधी गमावली आणि त्याने चाहते प्रचंड नाराज दिसले. ७४व्या मिनिटाला पुन्हा रोनाल्डोने तेच केले, परंतु यावेळी त्याला रोखायला काँगोचे दोन खेळाडू उभे राहिले.

Portugal vs Congo DR : महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या, पण Fifa World Cup स्पर्धेत भरारी... पोर्तुगालविरुद्ध ऐतिहासिक गोल करणाऱ्या 'काँगो' देशाची हवा...

काँगोच्या बचावपटूंचे कौतुक करावे तेवढे कमी होते. पेनल्टी क्षेत्रात त्यांनी पोर्तुगालच्या प्रत्येक खेळाडूच्या समोर दोघांना उभे केले होते. ७७व्या मिनिटाला काँगोकडून जोदरात प्रत्युत्तर झाले, नशीबाने त्यांना गोल करता आला नाही. पोर्तुगालच्या नावाजलेल्या खेळाडूंना शेवटच्या क्षणापर्यंत काँगोने विजयी गोल मिळवण्यासाठी झुंजवले. पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतही त्यांना गोल करता न आल्याने सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.