Operation Tiger : मोठी बातमी! ठाकरेंना दणका, सहा खासदारांनी थेट… शिंदेंच्या बड्या नेत्याने दिली माहिती
GH News June 18, 2026 03:12 PM

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाकडून तातडीने आपल्या खासदारांना व्हिप बजावण्यात आले. दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने मोठी अपडेट दिली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकताच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठी अपडेट दिली आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते ऑपरेशन टायगरच्या घडामोडींचे साक्षीदार असल्याचा दावा देखील ते करत आहेत.

श्रीरंग बारणे दिल्लीत

“ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय.असा मोठा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी केलाय. लवकरचं ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील”, असा विश्वास ही बारणेंनी व्यक्त केला आहे. ऑपरेशन टायगरच्या घडामोडी घडताना बारणे स्वतः दिल्लीत हजर होते.

श्रीरंग बारणे नेमकं काय म्हणाले?

पुढे श्रीरंग बारणे म्हणाले की, “मुळात हे काल-परवा घडलेलं नाही तर गेली वर्षभर हे सहा खासदार खदखद व्यक्त करत होते. उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत सर्व कल्पना आहे. फक्त कोणत्या दिवशी हे पाऊल उचलायचं हे ठरत नव्हतं, जे काल घडलं. येत्या दोन-तीन दिवसांत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि ते सहा खासदार कोण हे सर्वांसमोर येणार आहे. असा दावा बारणेंनी केला आहे.”

शिवसेनेकडून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर फेल गेले आहे. तसेच अनेक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खासदार शिवेसना शिंदे गटात 19 जूनला प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. पण ही तारीख पुढे ढकलल्याचे देखील बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाले फक्त घोषणा करणे शिल्लक आहे असे देखील सांगितले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.