जळगाव - राज्यात अद्याप मॉन्सून दाखल झाला नसतानाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्याची घाई केली आहे. बागायतदार शेतकऱ्यांकडून कापसाचा पेरा करण्यात आला आहे. यासोबतच मॉन्सूनपूर्व पीक लागवडीलादेखील सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मका व उडीद व मुग यांसारख्या पिकांची पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मॉन्सूनचा नियमित पाऊस वेळेत न झाल्यास उगवण झालेल्या पिकांवर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील काही भागात काही दिवसांपूर्वी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमशागतीची कामे वेगाने पूर्ण केली. दरम्यान, यंदा मॉन्सून उशिराने येणार असल्याचा अंदाज होता. तरीदेखील खरीपाची तयारी करीत शेतकऱ्यांनी बियाणे, खते व औषधांची खरेदी करून पेरणीची तयारी केली. अनेक शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाच्या आगमनापूर्वीच धूळपेरणी उरकण्याचा प्रयत्न केला आहे.
मक्याचीही लागवड
आज ना उद्या मॉन्सूनचा पाऊस येणार, या अपेक्षेतून काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच अर्थात धूळपेरणी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मका, सोयाबीन, उडीद व मुगाचीही लागवड केली आहे. यात १,०८३ हेक्टरवर मका, सोयाबीन (१९१ हेक्टर), मुग (११८ हेक्टर), उडीद (९४ हेक्टर) लागवड झाली आहे. अर्थात पाऊस पडताच पिकांची उगवण होईल.
कृषी विभागाकडून आवाहन
पुरेसा व सलग पाऊस झाल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर पेरणी करणे अधिक सुरक्षित असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. अर्थात मॉन्सून उशिरा आल्यास किंवा पावसात खंड पडल्यास उगवलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजावर लक्ष ठेवून नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
कपाशीचा पेरा करण्यावर भर
यंदा मॉन्सून कमी व उशिराने येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा होता. त्यानुसार कृषी विभागाकडून पुरेसा पाऊस आल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाळी कापसाची लागवड करण्यासोबत काही शेतकऱ्यांनी मॉन्सूनची वाट न पाहता कोरड्यातच कापूस लागवड करून टाकली आहे. त्यामुळे १२ जूनपर्यंत उन्हाची व कोरडवाहूची जिल्ह्यात ३२ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला आहे.