वाघोली - वाघोलीला पाणी पुरवठा करणाऱ्या वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्ण पणे तळाला गेल्याने वाघोलीला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे पाऊस पडेपर्यंत वाघोलीकराना पाण्याची तीव्र टंचाई सहन करावी लागणार आहे. दरम्यान महापालिकेने टँकरने वाघोलीला पाणी पुरवठा करावी. अशी मागणी नगरसेवक रामदास दाभाडे यांनी महापालिकेकडे केली आहे.
दाभाडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यासमवेत वढू बुद्रुक येथील भीमा नदी वरील बंधाऱ्याची पाहणी केली. बंधाऱ्यातील पाणी साठा पूर्णपणे तळाला गेला आहे. वाघोलीकराना दिवसाआड पाणी मिळत होते. त्यामुळे काही तरी दिलासा होता. मात्र आता गंभीर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
महापालिकेकडून पूर्वीच्या वाघोलीला पाणी पुरवठा होतो. सोसायट्याना तर टँकरनेच पाणी विकत घ्यावे लागते. आता सर्वांनाच पाणी विकत घेण्याची वेळ येणार आहे. याच बंधाऱ्यातून केसनंद गावालाही पाणी पुरवठा होतो. त्यांनाही आता टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरही वेळेत मिळेल की नाही याची शाश्वती नाही. दाभाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना पाणी टंचाईची परिस्थिती सांगून टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.
'पाऊस लांबल्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे. नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल.'
- ज्ञानेश्वर कटके, आमदार
वाघोलीचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस नसल्याने तीव्रता आणखी वाढली आहे. महापालिकेने वाघोलीला टँकरने पाणी पुरवठा करावा. तसेच भामा आसखेड योजनेचे काम जलत गतीने करावे.
- रत्नमाला सातव, नगरसेविका.
वाघोलीकर कर भरतात तर त्यांना सुविधा मिळायला हव्यात. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी चर्चा करून पाण्याची व्यवस्था करावी. तसेच वाघोलीला टँकर सुरू करावे.
- शैलजीत बनसोडे, नगरसेवक
कर घेताय तर सुविधा द्यायला हव्यात. पाण्या सारख्या गंभीर प्रश्नावर महापालिकेने तातडीने निर्णय घेऊन व्यवस्था करायला हवी. सध्या त्वरित टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.
- प्रदीप सातव, नागरिक
पाणी टंचाई म्हणजे रोजचे जगण्याचे गणितच बिघडते. आम्हाला सध्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने पाण्याची त्वरीत व्यवस्था करावी.
- डॉ पल्लवी मेहेर, महिला, वाघोली