Illegal Gas Refilling : गॅसच्या अवैध रिफिलिंगला आळा कधी? पोलिस गुन्हे दाखल होऊन कारवाईनंतरही 'उद्योग' सुरूच
esakal June 20, 2026 03:45 AM

पिंपरी - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून इतर छोट्या सिलिंडर किंवा व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून देण्याचे प्रकार शहरात वाढत आहेत. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करून गुन्हे दाखल केले जात असले, तरी अवैध गॅस रिफिलिंगचा हा उद्योग अद्यापही राजरोसपणे सुरूच असल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागांत गॅस एजन्सीची दुकाने, टपऱ्या, गाळे, गोदामे आणि वस्त्यांमध्ये कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय गॅस रिफिलिंग केले जात असल्याचे समोर येत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस रबर पाईप, रेग्युलेटर आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरतात. ही प्रक्रिया कोणत्याही तांत्रिक मानकांचे पालन न करता केली जाते. काही ठिकाणी एका घरगुती सिलिंडरमधून अनेक लहान सिलिंडर भरून त्यांची जादा दराने विक्री केली जाते.

का केला जातो उद्योग?

  • कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळविण्याची अपेक्षा

  • परवान्याची आणि नियमांची बंधने टाळणे

  • कारवाईची भीती कमी

जून महिन्यात दाखल झालेले गुन्हे

  • २ जून - चाकणजवळील महाळुंगे येथे दोघांवर गुन्हा

  • ३ जून - चाकण मार्केट यार्डजवळील एका गॅस एजन्सीतील कारवाईत तिघांवर गुन्हा

  • ५ जून - चिखलीतील पाटीलनगर येथे एकाला अटक

  • ६ जून - भोसरीतील गॅस एजन्सी येथील कारवाईत एकाला अटक

  • ७ जून - भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे एकावर गुन्हा

  • ७ जून - भोसरीतील चक्रपाणी रस्ता येथे एकावर गुन्हा व एकाला अटक

  • १० जून - निघोजे येथे एकावर गुन्हा

  • ११ जून - चिंबळीतील लोखंडे वस्तीत एकाला अटक

  • १२ जून - भोसरीतील लांडगेनगर येथे एकावर गुन्हा

...तरीही प्रकार सुरूच

पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ठिकठिकाणी वेळोवेळी छापे टाकून सिलिंडर, वाहनांसह साहित्य जप्त केले जाते. या प्रकरणात विविध कलमांतर्गत गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीही, त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे हा अवैध उद्योग सुरूच राहत असल्याचे दिसून येते.

काय करावे?

  • अधिकृत वितरकांकडूनच गॅस सिलिंडर घ्यावा.

  • स्वस्त दरात किंवा संशयास्पद ठिकाणी गॅस भरण्याचा मोह टाळावा.

  • परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिस आणि संबंधित विभागाला माहिती द्यावी.

  • मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या जीवघेण्या उद्योगाला कायमस्वरूपी आळा घालण्यात यावा.

काही दुर्घटना

  • ताथवडे येथे मागील वर्षी टँकरमधील गॅस सिलिंडरमध्ये भरताना मोठी आग

  • चाकणजवळही अशाच प्रकारे टँकरमधील गॅस काढताना आग लागल्याची घटना घडली

  • चिखली येथे गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात स्फोट झाल्याने शेगडीची रिंग डोक्यात पडून एकाचा मृत्यू.

काय आहे धोका?

  • गॅस गळती होऊन आग लागण्याची शक्यता

  • स्फोट झाल्यास जीवित आणि वित्तहानीचा मोठा धोका

  • निकृष्ट उपकरणे आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने धोका अधिक वाढतो

  • सिलिंडरच्या क्षमतेपेक्षा जास्त गॅस भरल्यास स्फोटाचा धोका

अवैध रीतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. या प्रकरणी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. आपल्या परिसरात अशाप्रकारे गैरप्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

- मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, पिंपरी चिंचवड

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.