Shikrapur Accident : गॅस सिलिंडर ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; दुचाकीचालक जखमी
esakal June 20, 2026 03:45 AM

शिक्रापूर - चाकण-शिक्रापूर मार्गावरील पिंपळे जगताप येथे भारत गॅस रिफिलिंग प्लँटमधून बाहेर पडणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ज्येष्ठ महिला रखमाबाई साकोरे (वय-६०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक लक्ष्मण मारुती झेंडे हे गंभीर जखमी झाले असून, गॅस प्लँटच्या अवजड वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेंडे हे साकोरे यांना रुग्णालयातून घरी घेऊन जात असताना शुक्रवारी (ता. १९) ही दुर्घटना घडली. पिंपळे-जगताप रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एमएच १२ एचडी ५२१३) झेंडे यांच्या दुचाकीला (एमएच १२ डब्ल्यूटी ८८१०) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, साकोरे रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. झेंडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मंगेश जालिंदर साकोरे (रा. करंदी) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक मारुती रामचंद्र कापरे (वय ४६, रा. वाघाळे, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हवालदार संदीप बनकर पुढील तपास करीत आहेत.

पिंपळे-जगताप परिसरातील गॅस प्लँटमुळे होणाऱ्या अवजड आणि बेदरकार वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कंपनीच्या वाहनांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यांवरील वेगमर्यादा आणि सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचे या वेळी अनेकांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.