Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व
esakal June 20, 2026 03:45 AM

अमरावती - सिंचन अनुशेषाचे जनक माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातील सिंचनावरील लढाईला धक्का पोहोचण्यासोबतच प्राध्यापक, शिक्षक संघटनांचे अपरिमित नुकसान झाले आहे.

प्रा. भाऊसाहेब तुळशीराम देशमुख विधान परिषदेत तब्बल पाच वेळा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते. सन १९८० ते २०१० असे तीस वर्षे त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

नुटा, एम फुक्टो, आयफुक्टो या संघटनांचे ते अध्यक्ष होते. विधान मंडळाच्या विविध समितीवरही त्यांनी प्रतिनिधीत्व केले असून आश्वासन समितीचे ते अध्यक्षही राहले आहेत. सन १९९६ ला त्यांना राष्ट्रकूल संसद परिषदेचा पहिल्या संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिंचन निर्मुलन अनुशेष समितीचे ते प्रमुख पदाधिकारी राहिले असून या समितीत विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ. सुनील देशमुख यांचाही समावेश होता.

या लढाईचे ते जनक म्हणूनच राज्यभरात प्रसिद्ध होते. अमरावती शहरासह ग्रामीण भागतील पाणी पुरवठा योजना अमलात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. विशेषतः अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठ्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नानेच आज या शहराला मुबलक पाणी मिळत आहे.

प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय प्रभूतींसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या नवसारी मार्गावरील फ्रेंडस कॉलनी येथील निवासस्थानी धाव घेतली.

आज अंत्यसंस्कार

प्रा. बी. टी देशमुख यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२०) येथील हिंदू स्मशान भूमीत सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली वैशाली वानखडे व डॉ. दीपा लाड व आप्तपरिवार आहे.

नुटा बुलेटिनला ५० वर्षे

प्रा. बी. टी. देशमुख यांनी सुरु केलेल्या नुटा बुलेटीनला ५० वर्षे झाली आहेत. या बुलेटिनच्या माध्यमातून प्राध्यापक व शिक्षकांचे प्रश्न अतीशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासोबतच शासनाकडून जारी करण्यात येणारे शासनआदेश तसेच त्याबाबतची चिकीत्सा करण्यात येते. आजही हे बुलेटिन सुरु आहे. त्यांच्या निधनाने २१ जुनला होणारा नुटाचा ५० वा वर्धापन दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.