ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला
esakal June 21, 2026 06:45 AM

Joe Root Joins Sachin Tendulkar In Elite Club: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात (ENG vs NZ) कसोटी मालिकेचा दुसरा सामना लंडनमध्ये सुरू आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जो रुटने कसोटी कारकि‍र्दीत मोठा पल्ला गाठला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले असले तरी जो रुटसाठी वैयक्तिकदृष्टीने हा सामना खास ठरला आहे.

या सामन्यात चौथ्या दिवशी (शनिवार, २० जून) न्यूझीलंडने इंग्लंडसमोर ४६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र इंग्लंडने दुसऱ्या डावात बेन डकेट (९), एमिलियो गे (११) आणि जेकॉब बेथल (०) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर जो रुटने हॅरी ब्रुकला साथीला घेत डाव सावरताना ९७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, रुट आणि ब्रुक या दोघांचीही अर्धशतके झाली.

Joe Root On Sachin Tendulkar Record:'... आता दुर्लक्ष करू शकत नाही', सचिनचा कसोटीतील विक्रम मोडण्याबाबत रुट नेमकं काय म्हणाला?

पण अखेर ब्रुकलाही मॅट हेन्रीने ५८ धावांवर बाद केले. त्यानंतर काही वेळ जेम्स ऱ्यूने रुटची साथ दिली. पण तोही १५ धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरीस जॉर्डन कॉक्सने रुटची साथ दिली. या दोघांनी नंतर चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट जाऊ दिली नाही.

त्यामुळे इंग्लंडच्या दुसऱ्या डावात चौथ्या दिवस अखेर ४८ षटकात ५ बाद १८२ धावा केल्या आहेत. त्यांना अद्याप विजयासाठी २८१ धावांची गरज आहे, तर न्यूझीलंडला ५ विकेट्सची गरज आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी या सामन्याचा निकाल लागू शकतो. चौथ्या दिवस अखेर जो रुट १३७ चेंडूत ८ चौकारांसह ७५ धावांवर नाबाद आहे, तर कॉक्स शून्यावर नाबाद आहे.

जो रुटचा विक्रम

रुटने या डावात फलंदाजी करताना कसोटी कारकि‍र्दीत १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो १४ हजार कसोटी धावांचा (14000 Test Runs) टप्पा गाठणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज आहे, तर जगातील केवळ दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी असा पराक्रम केवळ सचिन तेंडुलकरने केला आहे. भारताच्या सचिन तेंडुलकरने कसोटीत सर्वाधिक २०० सामन्यांत ५१ शतकांसह ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत.

जो रुटने २० जून २०२६ पर्यंत १६५ सामन्यांतील ३०२ डावात ४१ शतकांसह ५०.९८ च्या सरासरीने १४०७३ धावा केल्या आहेत. दरम्यान, रुटने ३०२ डावात १४ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे सर्वात जलग १४ हजार कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे, त्याने २७९ डावात १४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

दरम्यान, ३५ वर्षीय रुट आता सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या विश्वविक्रमाच्या जवळ आला आहे. त्याला सचिन तेंडुलकरला मागे टाकण्यासाठी १८४८ धावांची गरज आहे. कसोटीत सचिन आणि रुट यांच्याव्यतिरिक्त कोणीही १४ हजार धावांचा पल्ला गाठलेला नाही.

सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन आणि रुटच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. त्याने १६८ कसोटी सामन्यांत १३३७८ धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ जॅक कॅलिस (१३२८९ धावा) आणि राहुल द्रविड (१३२८८ धावा) आहे.

ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर जो रुट ४ वर्षांनी करतोय नेतृत्व

दरम्यान, या सामन्यातून जो रुट चार वर्षांनी कर्णधार म्हणून परतला आहे. सध्या नियमित कर्णधार बेन स्टोक्सवर शिस्तभंगाची चौकशी सुरू असल्याने तो न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे रुटकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा इंग्लंडने दिली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद ३९१ धावा केल्या होत्या, त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात सर्वबाद २९१ धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडला १०० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडने सर्वबाद ३६२ धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील १०० धावांच्या आघाडीमुळे न्यूझीलंडसमोर ४६३ धावांचे लक्ष्य ठेवले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.