Nashik Vidhan Parishad Election Result 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election Result 2026) मोठा उलटफेर झाला आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यांची माघार ठरवली होती, ते अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा दारूण पराभव केला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवत गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय संपादित केला. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला असून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकच्या निकालाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "नाशिकचा निकाल धक्कादायक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले. तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. खरं म्हणजे महायुतीचे जवळपास पावणे पाचशे मतं होते. तरीदेखील महायुतीच्या उमेदवाराला इतकी कमी मतं पडली, याचे कारण शोधण्याची आवश्यकता आहे. मी निश्चितच शिंदे साहेबांना जाऊन भेटणार आहे. उदय सामंत यांच्याशी देखील माझे बोलणे झाले. हे का झाले आणि कशामुळे झाले, कोण आमच्या बाजूने उभे राहिले नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे. निश्चितच याबाबतीत चौकशी केली जाईल."
नरेंद्र दराडे यांनी पराभवानंतर "माझा सर्वांनी विश्वासघात केला" असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले, "मी बघितलं, त्यांनी माझं देखील नाव घेतलं आहे. सध्या ते हरलेले असल्यामुळे वेगळ्या मनस्थितीत आहेत. पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदे साहेबांना माहित आहे आणि उदय सामंत यांना देखील माहित आहे की आम्ही किती प्रयत्न केले. मी असा माणूस नाही, ओठात एक आणि पोटात एक असा माझा स्वभाव नाही. पण दुर्दैवाने आमचा पराभव झालेला आहे. हा आम्हाला मोठा धक्का आहे," असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी महायुतीच्या राज्यव्यापी कामगिरीचाही उल्लेख केला. "मी आधीपासून सांगत होतो की, 17 च्या 17 जागा आमच्या निवडून येतील. विरोधी पक्षाला खातं सुद्धा उघडता येणार नाही आणि ते तंतोतंत खरे झाले आहे. एक नाशिकची जागा वगळली, पण ती जागा विरोधी पक्षाला मिळालेली नाही. तिथे अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे. विरोधकांचा दारुण पराभव झालेला आहे," असे महाजन म्हणाले.
नरेंद्र दराडे यांच्या नाराजीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, "नरेंद्र दराडे यांचे म्हणणे योग्य नाही. त्यांचा पराभव झालेला आहे, त्यामुळे ते संतापात आहेत, रागात आहेत. पण त्यांनी असे बोलू नये. ते आमदार राहिलेले आहेत. त्यांचे भाऊ देखील आमदार आहेत. महायुतीची इतकी मोठी मतं असताना 250 मतं त्यांना मिळाली, हा खरा संशोधनाचा भाग आहे. यासंदर्भात आम्ही पूर्ण चौकशी करू."
गोकुळ गीते हे लवकरच शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असून त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणे झाले आहे, तसेच ते विशेष विमानाने मुंबईत (Mumbai) दाखल होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले, "या बाबतीत मला काही माहिती नाही. माझा आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
नाशिक एकूण मतदान - 618
अवैध मतदान - 13
वैध मतदान - 605
फायनल कोटा - 303
अपक्ष गोकुळ गीते - 357
शिवसेना नरेंद्र दराडे - 248
आणखी वाचा