रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! ATM प्रमाणे सोय, देशभरातील कोणत्याही दुकानातून तांदूळ, गहू खरेदी करता येणार
एबीपी माझा ब्युरो June 22, 2026 04:13 PM

नवी दिल्ली : देशातील रेशन धान्य घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी सरकार सातत्याने डिजिटल सुविधांवर भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने रेशन वितरण व्यवस्थेत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता रेशन कार्डधारकांना आपलं संपूर्ण धान्य एकाच रेशन दुकानातून घेण्याची सक्ती असणार नाही. नागरिक आता आपल्या सोयीनुसार कोणत्याही रेशन दुकानातून वेगवेगळे धान्य घेऊ शकतील. म्हणजेच एका दुकानातून गहू तर दुसऱ्या दुकानातून तांदूळ घेण्याची मुभा ग्राहकांना मिळणार आहे.

या नवीन बदलामुळे रेशन दुकानांवर तासनतास लांबच लांब रांगेत उभे राहणे, बायोमेट्रिक मशीनमध्ये अंगठा न लागणे किंवा दुकानात धान्य उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण रेशन न मिळणे यांसारख्या त्रासापासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी या नव्या सुविधेबाबत अधिकृत माहिती दिली.

What is One Nation One Ration Card : रेशनची एटीएम सेवा

केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी त्यांच्या 'X' (ट्विटर) पोस्टद्वारे माहिती दिली की, सरकार 'वन नेशन वन राशन कार्ड' (ONORC) योजनेच्या अंतर्गत रेशन वितरण व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी वेगाने काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डधारक आपल्या रेशनचा वेगवेगळा हिस्सा आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या रेशन दुकानातून आणि देशाच्या कोणत्याही भागातून उचलू शकतात.

ही नवीन सुविधा हुबेहूब एटीएम (ATM) मशीनसारखी काम करते. ज्याप्रमाणे आपण आपल्या गरजेनुसार कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो, अगदी त्याचप्रमाणे रेशन कार्डधारक आता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपले हक्काचे धान्य मिळवू शकतात.

Benefits of ONORC : 'वन नेशन वन राशन कार्ड' योजनेचे मुख्य फायदे

या सुविधेमुळे रेशनिंग व्यवस्थेत मोठे बदल पाहायला मिळतील,

स्थलांतरितांना मोठा दिलासा : या योजनेचा सर्वाधिक फायदा प्रवासी मजूर आणि त्यांच्या कुटुंबांना होणार आहे.

मूळ गावाची अट रद्द : नोकरी किंवा रोजगारासाठी बाहेरगावी राहणाऱ्या नागरिकांना आता रेशन घेण्यासाठी आपल्या मूळ गावी जाण्याची किंवा तिथल्या रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

बायोमेट्रिक पडताळणी : नागरिक आता देशातील कोणत्याही राज्यात किंवा शहरात राहून फक्त आपल्या आधार कार्ड आणि बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) पडताळणीच्या माध्यमातून रेशन प्राप्त करू शकतात.

धान्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य : जर एखाद्या रेशन दुकानात केवळ गहू उपलब्ध असेल आणि तांदूळ संपला असेल, तर ग्राहक दुसऱ्या दुकानात जाऊन आपल्या वाट्याचा तांदूळ मोकळेपणाने घेऊ शकतात.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.