बऱ्याचदा आपण सगळेच अंघोळ झाल्यानंतर कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरतो खरं तर ही अनेकांची रोजची सवय असते. कानात पाणी गेलं की लगेच कॉटन बड्स घेऊन ते स्वच्छ करण्याची घाई होते. अनेकांना वाटतं की यामुळे कानातील मळ पूर्णपणे बाहेर पडतो आणि कान स्वच्छ राहतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय जितकी सामान्य वाटते तितकीच धोकादायकही ठरू शकते.
कानातील मळ काढण्याच्या प्रयत्नात अनेकजण नकळत तो आणखी आत ढकलतात. यामुळे कान बंद होणे, ऐकण्यात अडचण येणे आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
मळ बाहेर नाही तर आत जातो
कानातील मळ हा शरीराचा नैसर्गिक संरक्षणात्मक भाग आहे. तो धूळ, घाण आणि सूक्ष्म जंतूंना आत जाण्यापासून रोखतो. कॉटन बड्स वापरताना मळ बाहेर येण्याऐवजी तो कानाच्या आतल्या भागात ढकलला जातो. कालांतराने हा मळ साचून त्रास निर्माण करू शकतो.
अंघोळीनंतर कानाच्या आतील त्वचा किंचित ओलसर आणि मऊ झालेली असते. अशा वेळी कॉटन बड्स जास्त आत गेल्यास त्वचेला ओरखडे लागू शकतात. काही वेळा सूज, वेदना आणि जळजळही जाणवू शकते. कालांतराने हा मळ सायचून आणखी त्रास निर्माण का शक्यता जास्त असते
संसर्गाचा धोका वाढतो
कानात पाणी अडकलेले असताना कॉटन बड्स वापरल्यास ओलावा अधिक काळ टिकून राहू शकतो. अशा वातावरणात जीवाणू आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते. परिणामी कानाला संसर्ग होऊ शकतो आणि उपचारांची गरज भासू शकते.
रक्त येण्याची शक्यता
कॉटन बड्स चुकीच्या पद्धतीने वापरल्यास कानाच्या आतील नाजूक त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे रक्तस्त्राव होणे किंवा तीव्र वेदना होण्याचा धोका वाढतो. विशेषतः मुलांच्या कानात कॉटन बड्स वापरताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
कानाचा पडदा फाटणे
कानाचा पडदा अत्यंत पातळ आणि संवेदनशील असतो. कॉटन बड्स जास्त आत गेल्यास पडद्याला इजा होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये पडदा फाटण्याची शक्यता देखील असते. यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
कान स्वच्छ कसे करावेत?
तज्ज्ञांच्या मते कान स्वतःची स्वच्छता स्वतः करत असतो. बाहेरील भाग मऊ कापडाने स्वच्छ करणे पुरेसे असते. कानात मळ जास्त साचल्याची समस्या वाटत असल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी कानाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. तर कानासंबंधी कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.