BMC : भाजप नगरसेवकाने आक्षेप घेताच अधिकाऱ्याचे थेट निलंबन, नेमकं प्रकरण काय?
Tv9 Marathi June 23, 2026 01:45 AM

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या विधी समितीत भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रोटोकॉल अधिकारी संदीप लाळगे यांच्या कथित “So What?” उत्तरावर आक्षेप घेतला होता. यानंतर या अधिकाऱ्याच्या निलंबनाचा ठराव सादर करण्यात आला होता. हा ठकाव एकमताने मंजूर झाल्याने अधिकारी थेट निलंबित करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन

समोर आलेल्या माहितीनुसार भाजपचे स्थानिक नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचे नाव उद्घाटनाच्या कोनशिलेवर नव्हते. याबाबत विचारणा केली असता प्रोटोकॉल अधिकारी संदीप लाळगे यांनी सो व्हॉट असे उत्तर दिले होते. महापालिकेच्या विधी समितीत भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रोटोकॉल अधिकारी संदीप लाळगे यांच्या कथित उत्तरावर आक्षेप घेतला होता. यावेळी समितीत गोंधळ झाला. त्यानंतर अधिकाऱ्याच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संदीप लाळगे यांना निलंबित करण्यात आले आहे.

काय म्हणाले तेजिंदर सिंग तिवाना ?

या प्रकरणावर बोलताना तेजिंदर सिंग तिवाना यांनी म्हटले की, अधिकाऱ्यांकडून वारंवार लोकप्रतिनिधींना डावलण्याचे प्रकार घडत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान. राज शिष्टाचार अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम मुलभूत शिष्टाचार शिकण्याची गरज आहे. अधिकारी हे लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यासाठी असतात, त्यांना कमी लेखण्यासाठी नाही. सो व्हॉट अशी अरेरावीची भाषा प्रशासनाला शोभणारी नाही. आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. लोकशाही मुल्ये, प्रोटोकॉस आणि निष्पक्षता अबाधित रहावी यासाठी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

कोण आहेत तेजिंदर सिंग तिवाना?

तेजिंदर सिंग तिवाना हे मुंबईतील भाजपचे युवा आणि लोकप्रिय चेहरे मानले जातात. त्यांचे समर्थक त्यांना तेजू या नावानेही ओळखतात. ते मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष असून युवकांशी संबंधित प्रश्न, स्थानिक नागरी समस्या आणि पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी सक्रियपणे कार्य करतात. तेजिंदर सिंग तिवाना यांनी मलाड येथील प्रभाग क्रमांक 47 मधून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 13,858 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.