Argentina vs Austria FIFA World Cup 2026 Match Reports in Marathi : लिओनेल मेस्सीच्या ( Lionel Messi) दोन गोलच्या जोरावर गतविजेत्या अर्जेटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी ऑस्ट्रियावर २-० अशी मात केली. अर्जेटिनाने J गटात सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून Round of 32 मध्ये आपला प्रवेश पक्का केला. या गटातून दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रियाच आघाडीवर आहे. मेस्सीच्या त्या विक्रमी गोलचा Video सध्या सोशल मीडिया गाजवतोय...
दोन दिवसानंतर मेस्सी ३९ वर्षांचा होणार आहे आणि सोमवारी त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एक दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रियाविरुद्ध १०व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी गमावल्यानंतर मेस्सीने ३८ व्या मिनिटाला डोळ्यांचे पाणे फेडणारा गोल केला. या गोलसह तो वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक १७ गोल करणारा खेळाडू बनला. अल्जेरियाविरुद्धच्या लढतीत तीन गोल करून त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोजची ( १६) बरोबरी केली होती. आज त्याने त्याला मागे सोडले. फ्रान्सचा कायलिन एमबापे १४ गोलसह मेस्सीच्या मागे आहे. मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलग सहा सामन्यांमध्ये गोल करणारा तिसरा खेळाडू आहे. ( Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...)
पहिल्या हाफमध्ये मेस्सीला एकापेक्षा जास्त गोल करण्यापासून ऑस्ट्रियाच्या बचावफळी व गोलरक्षक अॅलेक्सांझर श्लेगरने रोखले होते. त्यामुळेच गतविजेत्यांना १-० अशा आघाडीवर समाधान मानावे लागले. दुसऱ्या हाफमध्येही अर्जेटिनाची त्याने डोकेदुखी वाढवली होती. मेस्सीचे आक्रमण तो सहज थोपवून लावत होता आणि त्यामुळे ७० मिनिटे उलटूनही अर्जेंटिनाच्या खात्यात एकच गोल दिसला.
दुसऱ्या हाफमध्ये ऑस्ट्रिया अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी काही संधीही निर्माण केल् होत्या. पण, अर्जेंटिनाच्या क्षेत्रात त्यांना निर्णायक टच साधता आला नाही. लिओनेल स्कालोनीने ज्युलियन अल्वारेझ आणि निको गोन्झालेझ यांसारख्या नवीन खेळाडूंना मैदानात उतरवल्यामुळे, ऑस्ट्रियन संघाला ही कोंडी लवकरात लवकर फोडावीच लागणार होती.
अर्जेंटिनाकडूनही आघाडी दुप्पट करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि पाच मिनिटांच्या भरपाई वेळेच्या शेवटच्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल करून संघाला २-० असा विजय मिळवून दिला. दोन्ही संघांच्या बचावफळीचे कौतुक करावे तेवढे कमीच होते. अर्जेंटिनाने गेल्या वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात दोन सामन्यांमध्ये आणि चषक जिंकण्याच्या प्रवासात एकूण तीन सामन्यांमध्ये गोल खाल्ला नाही. पण त्यांनी सलग दोन सामन्यांमध्ये गोल न खाता स्पर्धेची सुरुवात यापूर्वी १९९८ मध्ये केली होती. ऑस्ट्रियाने त्यांच्या पहिल्या लढतीत जॉर्डनवर ३-१ असा विजय मिळवला होता आणि ते पुढील फेरीच्या शर्यतीत अजूनही आहेत.