उद्धव ठाकरेंना आणखी मोठा झटका बसणार? ऑपरेशन टायगर सुरूच राहणार? एकनाथ शिंदे यांचे विधानसभेतूनच संकेत
Tv9 Marathi June 23, 2026 04:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. मात्र हे ऑपरेशन टायगर अद्याप संपलेलं नाही. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच आज विधानसभेत तसे संकेत दिले आहेत. अजून धक्के बसतील, असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं मानलं जात आहे.

विधानसभेत प्रमुख मंत्री नसल्याने शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. सभागृहात प्रमुख मंत्र्यांनी उपस्थित राहावं. इतर मंत्र्यावर अशी जबाबदारी टाकून चालणार नाही. मंत्री बाहेर असणं योग्य नाही. मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार? असा सवाल जयंत पाटील यांनी केला होता. तर, मंत्री तुम्हाला आणि आम्हाला गृहीत धरत आहेत. ही गंभीर बाब आहे. यापूर्वी अशी कधीच प्रथा नव्हती, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गटावर निशाणा साधला.

जोर का झटका…

मी त्यांना सांगू इच्छितो काल जो जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. अजून आणखी झटके लागणार आहेत, असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलं. त्यामुळे ऑपरेशन टायगर अद्याप संपलं नसल्याचं बोललं जात आहे. पुढच्या टप्प्यात शिंदे यांच्या टार्गेटवर कोण असणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अरे वेड्या कसा…

सभागृहात राज्यमंत्री असतात. एखाद्या प्रश्नाला आणि लक्ष्यवेधीला वेळ देता आला पाहिजे म्हणून अध्यक्षांच्या परवानगीने राज्यमंत्री सभागृहात ठेवले आहेत. जेव्हा महत्त्वाची चर्चा असते तेव्हा मी येतो, सीएम येतात आणि उत्तरे देतात. आता त्यांच्याकडे (ठाकरे गट) मुद्दे नाही, ते नैराश्यात आहेत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आता ते नाहीये, नाही तर म्हणालो असतो कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या असा वाया गेलास तू…, असा हल्लाच शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता चढवला आहे.

पोराटोरांच्या नादी लागला…

त्यांना ज्या ज्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे त्यासाठी विरोधक (ठाकरे गट) सभागृहात थांबले पाहिजे. आम्ही उत्तरे देण्यासाठी समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसती स्टंटबाजी करू नका. जयंतराव, विजयभाऊ, नानाभाऊ तुम्ही मोठे आहात, समजदार आहात. तुम्ही त्यांच्या नादाला लागले. तुम्ही पोराटोरांच्या नादी लागला आहात. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा. कोणतेही प्रश्न मांडा. आम्ही उत्तरे द्यायला सक्षम आहोत, असंही ते म्हणाले.

जो शिशे के घर में…

पैसे नाही दिले, शेतकऱ्यांवर अन्याय केला… असं खोटंनाटं चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे. ही जागा छोटी छोटी होत चालली आहे. आत्मपरिक्षण करा. आत्मचिंतन करावं. जो शिशे के घरो में रहते है, वह दुसरो के घर पर पत्थर नही फेका करते. जरा त्यांना समजून सांगा, असा चिमटाही त्यांनी काढला.

रात्रीचे खेळ…

दरम्यान, प्रमुख मंत्रीच सभागृहात नसल्याने आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्र्यांना फोडाफोडीचे रात्रीचे खेळ जमतात. हाऊसमध्ये बसता येत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यानी केली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.