हिंदू धर्मात जपमाळेचं फार महत्त्व आहे. वेगवेगळ्या देवता, ग्रह आणि साधनेसाठी वेगवेगळ्या माळा शुभ मानल्या जातात. योग्य जपमाळ निवडल्याने साधकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. पण प्रत्येक माळेतील एक सारखी असणारी गोष्ट म्हणजे, माळेतील मणी… प्रत्येक माळीत 108 मणी असतात. सनातन धर्मात 108 या संख्येला अत्यंत पवित्र स्थान आहे . रुद्राक्ष माळेत किंवा तुळशीच्या माळेत सहसा 108 मणीच असतात. 108 वेळा जप केल्यावर तो पूर्ण होतो, असा अनेकांचा विश्वास आहे. 108 या संख्येला केवळ धार्मिकच नव्हे, तर वैज्ञानिक, भौगोलिक आणि सामाजिक महत्त्वही आहे. हे विश्वाचे प्रतीक आहे.
अष्टोत्त शतनामावलीमध्ये देवाची 108 नावे आहेत. गायत्री मंत्रासह कोणताही जप 108 वेळा केल्यास पूर्ण फळ मिळते. आध्यात्मिक बाबींव्यतिरिक्त, मानवी शरीरातही 108 या संख्येला महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की, शरीरात 108 हृदयचक्र आणि 108 नाड्या आहेत. कला क्षेत्रातही 108 या संख्येला महत्त्व प्राप्त झाले आहे. संगीतामध्ये 108 प्रकारच्या रचना आणि भरतनाट्यममध्ये108 करण आहेत.
ज्योतिषशास्त्रामध्ये 108 या संख्येला एक विशेष स्थान आहे. प्राणायामामध्येही 108 ला महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत 108 पद्धती आणि संकल्पनांचा उल्लेख आढळतो अंकशास्त्रानुसार, 1(सूर्य), 0 (शून्य) आणि 8 (शनि) या अंकांचा अद्भुत संयोग म्हणजे 108 आहे. जेव्हा 36 भूतकाळ, 36 वर्तमानकाळ आणि 36 भविष्यकाळ यांची बेरीज केली जाते, तेव्हाही 108 हाच आकडा येतो, जो काळाची परिपूर्णता दर्शवतो. सूर्योदय, ब्राह्मी मुहूर्त, अभिजीन मुहूर्त किंवा गोधुली मुहूर्त यांसारख्या पवित्र वेळी108 वेळा नामजप करून, भगवंताला 108 फुले अर्पण करून किंवा 108 प्रकारे ईश्वराला शरण जाऊन ही परिपूर्णता प्राप्त केली जाते.
जर कोणाला दान करायचे असेल, तर 108 किंवा त्याहून अधिक संख्येने दान केल्यास शुभ परिणाम मिळतात. हा ब्रह्मांडाचा अंक आहे, ज्याचं पालन केल्याने आपल्या शरीरात आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. कोणत्याही पूजा-पुनःपुण्यविधीमध्ये 108 या अंकाला अधिक महत्त्व दिल्याने विशेष शक्ती मिळते. हे केवळ एक वैयक्तिक मत नसून, ऋषीमुनी, वेद आणि पुराणांमध्ये सांगितलेलं एक सत्य आहे. असं देखील मानलं जातं की, गुरूने दिलेला मंत्र किंवा स्वतः प्राप्त केलेला मंत्र दिवसातून किमान एकदा, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून 108 वेळा जपणे शुभ असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)