नवी दिल्ली : देशातील महत्त्वाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म सन्मानांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाले. राज्यातील सात मान्यवरांना विविध क्षेत्रातील कार्यासाठी पद्मने गौरविण्यात आले. त्यात प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, क्रिकेटपटू रोहित शर्मा, डॉ. आर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते आर. माधवन, सतीश शाह (मरणोत्तर) आणि उद्योगपती अशोक खाडे या मान्यवरांचा समावेश आहे.
पद्म सन्मान वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ६५ मान्यवरांना गौरविण्यात आले. यात दोन पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि ५६ पद्मश्री विजेत्यांचा समावेश होता. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन , पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. १६ हून अधिक भाषांत दोन हजारांपेक्षा जास्त गीते गाऊन त्यांनी संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
पहिली मानवी दूध बँक
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रिकेटपटू रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना हा पुरस्कार देण्यात आला. नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. फर्नांडिस यांनी १९८९ मध्ये सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू केली.
तारपा वादकाचा सन्मान
वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आली. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांचा पद्मश्रीने गौरव करण्यात आला. माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून खाडे यांनी ‘दास ऑफशोअर’ कंपनीची स्थापना केली. अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश होतो.
शिक्षणाची संधी उपलब्ध
देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या केएलई सोसायटीचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. डॉ. कोरे यांनी गेल्या अनेक दशकांपासून केएलई संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.