Maharashtra Rain Update : कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश! अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती
esakal June 24, 2026 03:45 AM

पुणे - मॉन्सूनने सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत मंगळवारी मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग व्यापला. दुसरीकडे मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापत मोसमी पावसाने विदर्भातही प्रवेश केला. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन दिवसांत मॉन्सूनची आणखी प्रगती अपेक्षित असून, येत्या आठवड्यात कोकणात सर्वदूर पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रावर मोसमी वाऱ्यांना जोर आल्यामुळे मॉन्सूनने मंगळवारी अलिबागच्या पुढे वाटचाल करत मुंबईसह कोकणाचा उर्वरित भाग व्यापला. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील वर्ध्यापर्यंत मॉन्सूनने मजल मारली.

मॉन्सून आता राज्यातील चारही हवामानशास्त्रीय उपविभागांमध्ये पोचला असून, त्याने मंगळवारी तेलंगण, ओडिशाच्या उर्वरित भागांसह छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा बहुतांश भाग व्यापला. मॉन्सूनच्या प्रगतीची उत्तरसीमा सध्या डहाणू, वर्धा, रायपूर, डाल्टनगंज, मोतीहारी येथून जात आहे. मंगळवारी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोसमी पावसाने सर्वदूर हजेरी लावली.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक ठिकाणी दुपारनंतर विजांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यात २७ ते २९ जूनदरम्यान; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २४ ते २६ जूनदरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात विविध जिल्ह्यांत आज पावसाने हजेरी लावली. विशेषत: कोकण विभागात पावसाने दमदार उपस्थिती नोंदविली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. मुंबईत आगामी २४ ते ४८ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

नाशिकमध्येही दुपारी एक ते दीड तास जोरदार पाऊस कोसळला. भुसावळला पावसाबरोबर विजाही कोसळल्या. वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला.

मॉन्सूनच्या पावसाने आज सकाळीच मुंबईत आगमन केले. उपनगरांच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर अधिक होता. सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत शहर भागात सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. उद्या (ता. २४) काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता.​ २५) ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर ​२६ आणि २७ जूनला पावसाचा जोर ओसरेल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.

पावसाची वाटचाल

  • मुंबई : दिवसभर पावसाची हजेरी

  • पालघर : दिवसभर हलक्या सरी

  • धुळे : शहर तसेच साक्री, शिरपूर आणि दोंडाईचा परिसरात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

  • नाशिक : शहर आणि ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी मध्यम स्वरूपाचा पाऊस

  • सातारा : शहर, तालुका आणि जिल्ह्यातील पश्चिम भागात संततधार

  • पुणे : जुन्नर भागात ढगफुटीसदृश पाऊस

  • रत्नागिरी : पावसाची दमदार सुरुवात. रत्नागिरीत, राजापूर, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि मंडणगड हजेरी.

  • कोल्हापूर : हलक्या सरी कोसळल्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.