पुणे - खासगी टँकरचालकांकडून अवाच्या सवा दराने पिण्याच्या पाण्याचे टँकर विकले जात असतानाच महापालिकेच्या टँकरचे दरही गगनाला भिडले आहेत. महापालिकेकडून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा १० हजार लिटरचा टँकर ७३५ रुपयांना, तर १५ हजार लिटरचा टँकर १ हजार १५६ रुपयांना दिला जातो. मात्र महापालिकेकडून पाणी घेणारे टँकरवाले हेच पाणी पुढे तीन ते साडेतीन हजार रुपयांना विकत असल्याने नागरिकांची पिळवणूक होत आहे.
शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने टँकरची मागणी वाढली आहे.
महापालिकेच्या नऊ टँकर केंद्रांतून दररोज सुमारे १,७०० फेऱ्या होतात, तर खासगी टँकरद्वारे दोन हजारांहून अधिक खेपा केल्या जात आहेत. महापालिकेने यंदा ५० कोटी २६ लाख रुपयांच्या २६ निविदा काढल्या असून, २० ठेकेदारांकडे हे काम आहे. तरीही वाढत्या मागणीमुळे ही यंत्रणा अपुरी पडत आहे.
तासात ३०० टँकर भरण्याची क्षमता
महापालिकेची पर्वती, पद्मावती, एरंडवणे, चतु:शृंगी, महंमदवाडी, धायरी, खराडी, लष्कर व बाणेर येथे मिळून नऊ टँकर भरणा केंद्र आहेत. येथे एकावेळी ५० टँकर भरण्याची सुविधा असून तासाला सुमारे ३०० टँकर भरले जातात.
खासगी टँकरपेक्षा जास्त दर
शहरात खासगी विहिरींवर १० हजार लिटरचा टँकर १०० ते १५० रुपयांत भरून दिला जातो. त्याउलट महापालिकेच्या केंद्रावर त्यासाठी ७३५ रुपये, तर १५ हजार लिटरच्या टँकरसाठी १ हजार १५६ रुपये आकारले जातात. त्यामुळे टँकर व्यावसायिक वाहतूक, चालक व इतर खर्च धरून सामान्यतः दोन ते अडीच हजार रुपयांना टँकर विकतात. सध्याच्या टंचाईत हेच दर तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत गेले आहेत.
टँकरचे दर कमी करणे गरजेचे
नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे मूलभूत कर्तव्य आहे. खासगी विहिरी व बोअरवेलमधील पाणी अनेकदा पिण्यायोग्य नसते. त्यामुळे महापालिकेने टँकर भरण्याचे दर खासगी केंद्रांच्या धर्तीवर कमी केल्यास अधिक नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच खासगी टँकरचालकांनाही कमी दरात पाणी उपलब्ध होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
चालकांकडून होते लूट
महापालिकेकडून मोफत टँकर पुरविले जात असले तरी काही चालकांकडून २०० ते ३०० रुपयांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. पैसे न दिल्यास टँकर उशिरा आणणे, अर्धवट पाणी देणे किंवा अयोग्य वर्तन केल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे.
पिण्याचे पाणी हवे असल्याने महापालिकेच्या पॉइंटवरून टँकर मागविला. त्यासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागले. महापालिकेचे पाणी खूप महाग असून ते स्वस्तात उपलब्ध होण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे.
- प्रगती सकुंडे, नागरिक
महापालिकेचे पाणी टँकरद्वारे नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चलन भरून पाणी विकणाऱ्या टँकरचालकांचे दर नियंत्रणात राहावेत, यासाठी चलनाचे दर कमी करण्याबाबत प्रशासन स्तरावर विचार सुरू आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग
तुमचे मत मांडा
शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना लाखो रुपये खर्चून टँकर मागवावे लागत आहे. याबाबत तुमचे मत नावासह editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.