करिअर वेध : वर्तणुकीचा परिणाम
esakal June 24, 2026 10:45 AM

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

एका मोठ्या एम.एन.सी. कंपनीमध्ये एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ या पदासाठी निवड प्रक्रिया सुरू होती. अनेक उच्चशिक्षित, खूप अनुभव असलेले, परदेशात काम केलेले, मोठ्या हुद्द्यावर काम केलेले, असे उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. सर्वच उमेदवार ताकदीचे होते, परंतु त्यातून ‘सीईओ’ पदासाठी निवडली गेलेली व्यक्ती एका बाबतीत सर्वांपेक्षा उजवा ठरली आणि ती गोष्ट म्हणजे ‘वर्तणूक.’ नोकरीमधील उच्चस्तरीय काम असो, समाजसेवा असो, खेळाचे नेतृत्व असो किंवा कुटुंबाचा प्रमुख असो सर्व ठिकाणी तुमची वर्तणूक महत्त्वाची ठरते आणि तुमचे अनेक क्षेत्रातील यश, अपयश वर्तणुकीवर अवलंबून असते. त्यामुळे वर्तणूक चांगली असणे महत्त्वाचे आहे.

चांगल्या वर्तणुकीची ठळक वैशिष्ट्ये

  • सर्व परिस्थितीमध्ये शांत राहणे

  • कोणत्याही कारणाने चिडचिड न करणे

  • सगळ्यांचा आदर करणे

  • ग्रुपमध्ये, मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर दुसऱ्यांचा अपमान न करणे

  • चांगल्या सवयी आत्मसात करणे

  • चांगली देहबोली ठेवणे

  • सर्व चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे

  • समोरच्या माणसांच्या चुका त्याला एकांतात बसून सांगणे

  • नवीन गोष्टींना प्रोत्साहन देणे.

सचिन तेंडुलकरने त्याच्या पुस्तकांमध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगितली आहे, ती म्हणजे, वडील रमेश तेंडुलकर त्याला कायम सांगत असत की, तू क्रिकेटर म्हणून आयुष्यात फार तर वीस, पंचवीस वर्षे मोठे नाव करशील, परंतु एकदा का करिअर संपले की तू एक चांगला माणूस म्हणून नाव कमव. सचिनने स्वतःला एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सुनील गावस्कर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ या सर्व मोठ्या क्रिकेटवीरांनी त्यांच्या वागणुकीतून स्वतःबद्दलचा समाजातील मान कायम ठेवला आहे. या सर्वांना अनेक वेळा चुकीच्या निर्णयाचा (अंपायरमुळे) बळी पडावे लागले; परंतु त्यांनी प्रत्येक वेळी त्याचे उत्तर बॅट आणि बॉलने दिले. फील्डवर चुकीची वर्तणूक, प्रतिक्रिया दिलेली नाही. म्हणूनच ते ‘वेगळ्या लीगमध्ये’ गणले जातात.

कोणत्याही व्यक्तीला चांगली वर्तणूक विकसित करण्यासाठी खालील गोष्टींवर अभ्यास करावा. त्यानुसार आपल्या वर्तणुकीत बदल करणे हे महत्त्वाचे ठरेल

  • मनात कायम चांगले व सकारात्मक विचार आणणे

  • दुसऱ्यांना मदत करण्याची भावना कायम मनात असणे

  • दुसऱ्याला समजावून घेणे

  • पालकांनी मुलांना चांगल्या वागणुकीचे प्रात्यक्षिक घरातच घडवावे, म्हणजे आपोआप मुलांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

तुमची साथ-संगत, मित्रमंडळी, जवळचे लोक यांचा तुमच्या वर्तणुकीवर थेट परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या लोकांबरोबर जास्त वेळ घालवणे महत्त्वाचे असते. अशा लोकांची निवड योग्य वयात करणे हे महत्त्वाचे ठरते.

आपली समाजातील वागणूक चांगला किंवा वाईट माणूस बनवत असते. जो माणूस (आतून)चांगला आहे; त्याची वर्तणूक मैदानावर, ऑफिसमध्ये व बाहेर सगळीकडे चांगलीच असते. तुमच्या बाहेरील (कुटुंब, समाज आदी) वागणुकीचा परिणाम थेट तुमच्या करिअरवर होत असतो. त्यामुळे आपली वर्तणूक सातत्यपूर्ण चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.