मराठी भाषा, संस्कृती आणि मातृभाषेतील शिक्षणाचे जतन करण्यासाठी कराड तालुक्यातील कालगाव ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामीण भागातील मराठी शाळांचा घटता विद्यार्थीपट वाढविण्यासाठी आणि मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला हा निर्णय राज्यासाठी आदर्श ठरणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक मराठी शाळांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या घटल्याने वर्ग बंद करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कालगाव ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय मराठी शिक्षणाच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते कालगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरू शकतो. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी केवळ शासन नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, पालक आणि समाज यांचीही जबाबदारी आहे.
मराठी भाषा, संस्कृती जतनाच प्रयत्न
मराठी शाळा केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून त्या ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या केंद्रे आहेत. मराठी शाळांत विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भाषेबद्दल अभिमान निर्माण होतो. त्यामुळे मराठी शाळा टिकविणे ही काळाची गरज असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन
शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांचा बौद्धिक व भावनिक विकास मातृभाषेत अधिक प्रभावीपणे होतो. नवीन शैक्षणिक धोरणातही प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्यावर भर देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कालगाव ग्रामपंचायतीने आर्थिक प्रोत्साहनाच्या माध्यमातून पालकांना मराठी शाळांकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी शिक्षणाच्या संवर्धनाचा संकल्प
मराठी शाळा टिकल्या नाहीत तर आपली भाषा, संस्कृती आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक परंपरा धोक्यात येईल. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच आपल्या मातृभाषेचे ज्ञान मिळवावे, यासाठी ग्रामपंचायत सकारात्मक पाऊल उचलत आहे. हा निर्णय केवळ घरपट्टीमाफीचा नसून मराठी शिक्षणाच्या संवर्धनाचा संकल्प आहे, असे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी सांगितले.