मुंबई लोकल ट्रेन क्राईम न्यूज मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (23 जून) रात्री 10 च्या सुमारास सदर घटना घडली. मृत प्रवासी व्यक्तीचं नाव मयंक लोहार (22 वर्षीय) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीची ओळख पटली असून, त्याला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सहा पथके तैनात केली आहेत. सदर घटनेनंतर प्रवासांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. (Mumbai Local Train Crime News)
23 जूनच्या रात्री 10 च्या सुमारास मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. प्रथम श्रेणीच्या डब्यात ही घटना घडल्याची पोलिसांनी माहिती दिली. बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान ही घटना घडली. मुसळधार पावसात ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला होता. श्चिम रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद झाल्यानंतर इतरांनी आरोपीला मारहाण केली. संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून चाकू काढून मयंकवर हल्ला केला, ज्यात मयंकचा मृत्यू झाला. हल्लेखोर बोरिवली स्टेशनवर ट्रेन थांबण्यापूर्वीच उतरुन पसार झाला. सदर घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सहा पथके तैनात केली आहेत.
पश्चिम रेल्वेवरील मालाड इथे 24 जानेवारी 2026 मध्ये झालेल्या प्राध्यापक अलोककुमार सिंग यांची हत्या करण्यात आली होती. अलोक सिंग यांचीही धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी काही तासांतच ओंकार शिंदे या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आता काल रात्री हा प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवरून प्रश्नचिन्हं उपस्थित झालेत.