नाल्यात बुडणाऱ्या तीन चिमुकल्यांना पोकलेन चालकाने वाचवले, प्रसंगावधान राखून बकेटमधून उचलले
Marathi June 24, 2026 03:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भंगार गोळा करताना पाय घसरून पडल्याने नाल्यात बुडत असलेल्या तीन चिमुकल्यांना पोकलेनचाल काच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाले. उल्हासनगरमध्ये घडलेल्या या घटनेने ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला. मुले बुडत असल्याचे पाहताच क्षणाचाही विचार न करता चालकाने पोकलेनच्या बकेटमधून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. देवदूत बनून मुलांसाठी धावून आलेल्या सिद्धार्थ या चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेने नालेसफाईचे कंत्राट शुभम कंस्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. आज शहाड रोडवरील कोणार्क रेसिडेन्सी, राजीव गांधी नगरमधील नालेसफाईचे काम पोकलेन मशीनने सुरू होते. त्याचवेळी काही अंतरावर दोन तीन लहान मुले भंगार गोळा करण्यासाठी नाल्याच्या पाण्यात उतरले होते. हा नाला खोल आहे. मात्र मुलांना त्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा पाय घसरला आणि ते बुडू लागले. बाहेर येण्यासाठी मुलांचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. मात्र ते अधिकच गाळात रुतत होते. यामुळे घाबरून मुले ओरडू लागली. काही अंतरावर नालेसफाई करणारे पोकलेनचालक सिद्धार्थ यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी थोडाही वेळ न दवडता पोकलेन मुलांच्या दिशेने नेली आणि मुलांना बकेटमध्ये बसवून काठावर सोडले. काठावर उतरताच मुलांनी घराच्या दिशेने धूम ठोकली.

काळ आला होता पण…

भंगार गोळा करण्यासाठी नाल्यात उतरलेल्या उल्हासनगरमधील तीन मुलांसाठी आजचा दिवस काळ बनून आला होता. मात्र समयसूचकता दाखवून पोकलेन मशीन चालकाने त्यांचा जीव वाचवला. उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य समिती सभापती सविता तोरणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, कंत्राटदार शशांक मिश्रा यांनी चालक सिद्धार्थचे कौतुक केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.