Box Office Collection: शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) या चित्रपटाने कमाईत अवघ्या पाचव्या दिवशीच पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. रिलीजच्या पाचव्या दिवशीही ' चित्रपटाने फारशी उंच उडी घेतलेली दिसली नाही. दुसरीकडे, इम्तियाज अलीच्या ‘मैं वापस आऊंगा’ (Main Vapas Aayunga) या चित्रपटाने 12व्या दिवशीही कमाईत प्रचंड वाढ नोंदवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जाणून घेऊया कोणी किती कमाई केली..(Box Office Collection)
पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केल्यानंतर ‘कॉकटेल 2’ आता वीकडेजच्या कमाईची वाट काहीशी अडखळताना दिसत आहे. करोनानंतर मल्टिप्लेक्समध्ये प्रत्येक मंगळवारी सवलतीच्या दरात तिकीट मिळत असतानाही या चित्रपटाला त्याचा अपेक्षित फायदा मिळालेला नाही. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी देशभरात ‘कॉकटेल 2’चे एकूण 9,565 शो लावण्यात आले होते. मात्र थिएटर्समध्ये केवळ 16 टक्के ऑक्युपन्सी नोंदवली गेली. म्हणजे 100 पैकी तब्बल 84 सीट्स रिकाम्या होत्या.
सोमवारी चित्रपटाने 6.75 कोटी रुपये कमावले. तर मंगळवारी ही कमाई किंचित घटून 6.65 कोटी रुपये झाली.
शुक्रवार - 13.50 कोटी
शनिवार - 16.25 कोटी
रविवार - 17.75 कोटी
सोमवार - 6.75 कोटी
मंगळवार - 6.65 कोटी
यासह चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई 60.90 कोटींवर पोहोचली असून ग्रॉस कलेक्शन 72.75 कोटी झाले आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे 150 कोटी असल्याने अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे.
विदेशातही ‘कॉकटेल 2’ने ठीकठाक कामगिरी केली आहे. पाचव्या दिवशी ओव्हरसीज मार्केटमध्ये 1.50 कोटींची कमाई झाली. आतापर्यंत परदेशात एकूण 22.25 कोटींचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे चित्रपटाचा एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन 95 कोटींवर पोहोचला आहे.
दुसरीकडे, इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट हळूहळू प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. मंगळवारी या चित्रपटाच्या कमाईत तब्बल 24 टक्क्यांची वाढ झाली. चित्रपटाला मंगळवारी फक्त 2,789 शो मिळाले. मात्र ऑक्युपन्सी तब्बल 41 टक्के नोंदवली गेली, जी ‘कॉकटेल 2’पेक्षा खूपच जास्त आहे. सोमवारी चित्रपटाने 2.50 कोटी कमावले होते. तर मंगळवारी ही कमाई वाढून 3.10 कोटींवर गेली.
चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई आता 29.85 कोटी झाली असून ग्रॉस कलेक्शन 35.54 कोटींवर पोहोचले आहे. परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत 12.60 कोटींचा व्यवसाय केला असून एकूण वर्ल्डवाइड कमाई 48.14 कोटी झाली आहे.
चित्रपटाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता ‘मैं वापस आऊंगा’ हा इम्तियाज अलीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि दमदार चित्रपट मानला जात आहे. कमाईच्या बाबतीत जरी हा चित्रपट अजून बजेटच्या तुलनेत मागे असला, तरी भविष्यात तो ‘कल्ट क्लासिक’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दोन चित्रपटांव्यतिरिक्त थिएटर्समध्ये सुरू असलेल्या इतर हिंदी चित्रपटांची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. विशेषतः कंगना रणौतचा ‘भारत भाग्य विधाता’ आणि मनोज बाजपेयीचा ‘गव्हर्नर’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. विक्रम भट्टचा ‘हॉण्टेड 3D: इकोज ऑफ द पास्ट’ बजेट वसूल करण्यात यशस्वी झाला असला तरी आता त्याची कमाई मंदावली आहे. तर वरुण धवनचा ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपटही आता थकलेला दिसत आहे.