आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना 'हे' विचार नक्की करा
Tv9 Marathi June 24, 2026 06:45 PM

आजच्या या स्मार्ट युगात आपण देखील स्मार्ट राहिलं पाहिजे… कारण हिच काळाची गरज आहे. चाणक्यांनुसार, कधीकधी आपण इतरांना सांगितलेल्या गोष्टींमुळे भविष्यात आपल्याला त्रास आणि नुकसान होऊ शकते, तर कधीकधी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, काही रहस्ये अगदी जवळच्या लोकांनाही सांगू नयेत. अशा गोष्टी शक्य तितक्या गोपनीय ठेवणेच उत्तम. आचार्य चाणक्य नेहमी सांगतात, समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कितीही चांगला वागत असेल, तर लगेच वाहवत जाऊ नका. कायम काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करा आणि गुपित तुमच्याकडे ठेवा.

आर्थिक नुकसान: आचार्य चाणक्य म्हणतात की, आपले आर्थिक नुकसान कोणालाही सांगू नये. कारण, तुमची आर्थिक परिस्थिती कळल्यावर, तुम्ही मदत मागाल या भीतीने बहुतेक लोक तुमच्यापासून दूर राहतील. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणताही आधार मिळणार नाही, उलट तुमचे स्वतःचे लोकच तुमच्यापासून दूर राहतील. म्हणून, आपली आर्थिक अडचण कधीही दाखवू नका, त्याऐवजी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी शांतपणे प्रयत्न करा.

कुटुंबातील संघर्ष आणि मतभेद : प्रत्येक घरात लहानसहान मतभेद किंवा भांडणं होतात, जे अगदी सामान्य आहे. चाणक्य म्हणतात की, कुटुंबात घडणाऱ्या अशा घटना तिसऱ्या व्यक्तीला सांगू नयेत. कारण या जगात आपल्या हिताचा विचार करणारे लोक खूप कमी आहेत. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचं दुःख वाटून घेता, ती व्यक्ती तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमची थट्टा करण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुमचं दुःख वाढू शकतात.

कोणताही मोठा विश्वासघात किंवा अपमान: जर कोणी तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुमचा अपमान केला असेल, तर ती वेदना आणि राग मनातच ठेवा. इतरांना सांगू नका. जेव्हा तुम्ही इतरांना सांगता की तुमचा कोणी विश्वासघात केला आहे किंवा तुमचा अपमान केला आहे, तेव्हा लोक तुम्हाला कमकुवत आणि मूर्ख समजू लागतात. तुमची प्रतिष्ठा कमी होईल. आणि अशीही शक्यता आहे की तेसुद्धा तुमचा विश्वासघात करतील.

तुमची मानसिक उदासी आणि दुर्बलता: आचार्य चाणक्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख अनुभवावे लागताच. त्याचप्रमाणे, मनात नेहमीच एक प्रकारची भीती, असुरक्षितता आणि दुर्बलता असते. जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी इतरांना सांगता, तेव्हा लोक वरवर तुमची सहानुभूती दाखवतात, पण तुमच्या पाठीमागे ते तुमच्या असहायतेचा फायदा घेतात. वेळ आल्यावर, ते तुमच्या दुर्बलतेचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात.

भविष्यातील योजनांबद्दल बोलू नका : तुमची मोठी स्वप्ने, योजना आणि ध्येये पूर्ण झाल्यावरच सांगा. जर तुम्ही योजना पूर्ण होण्याआधीच या गोष्टी सांगितल्या, तर लोक तुम्हाला निराश करण्याचा किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. एवढंच नाही तर, तुमचे प्रेम आणि नातेसंबंध इतरांसोबत शेअर करणे टाळा. कधीकधी लोकांना तुमचा आनंद सहन होत नाही आणि ते तुमची नाती बिघडवण्याचा प्रयत्न करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.