दि. बा. पाटील यांच्या नावासाठी रश्मिता पोपेटा यांचे उपोषण
पनवेल, ता.२४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रश्मिता राम पोपेटा यांनी बुधवारी चिंचपाडा पुलाखाली बेमुदत उपोषण सुरू केले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले की, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्रांकडून होत असून आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
आगरी, कोळी, कराडी, ओबीसी समाज तसेच बारा बलुतेदारांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे पोपेटा यांनी स्पष्ट केले. शासनाने विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेईपर्यंत किंवा अधिकृत फलक लावला जाईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.