मुंबई होणार अधिक स्मार्ट, पर्यावरणपूरक!
esakal June 24, 2026 11:45 PM

मुंबई होणार अधिक स्मार्ट, पर्यावरणपूरक!
महापालिकेच्या तीन नव्या उपक्रमांना महासभेची एकमताने मंजुरी
​सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २४ : महापालिकेला अधिक डिजिटल, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने महासभेत मंगळवारी (ता. २३) तीन अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी मांडलेल्या या तिन्ही अभिनव सूचनांना पालिका महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या योजनांमुळे मुंबईतील ऐतिहासिक वारशाचे जतन तर होईलच, पण सोबतीला कचरा आणि गर्दी व्यवस्थापनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
​मुंबईतील अनेक रस्ते, चौक आणि सार्वजनिक वास्तूंना स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ आणि साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत. मात्र केवळ नाव असल्यामुळे नव्या पिढीला त्यांच्या कार्याची सखोल माहिती मिळत नाही. यावर उपाय म्हणून आता प्रत्येक नामफलकावर क्यूआर कोड लावला जाईल. हा कोड स्कॅन करताच नागरिकांना आणि पर्यटकांना त्या महान व्यक्तींचा जीवनप्रवास, ऐतिहासिक योगदान, छायाचित्रे आणि ऑडिओ-व्हिडिओ क्लिप विविध भाषांमध्ये उपलब्ध होतील. इतिहासतज्ज्ञ आणि सरकारी नोंदींच्या पडताळणीनंतरच ही माहिती अपलोड केली जाईल.
​​पावसाळ्यात मुंबईतील नाले आणि नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आणि तरंगणारा कचरा थेट समुद्रात वाहून जातो. यामुळे सागरी जीवसृष्टीचे नुकसान होते आणि किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचतात. यावर मात करण्यासाठी मुंबईतील प्रमुख नाले आणि नद्यांच्या मुखावर फ्लोटिंग गारबेज बॅरियर्स (तरंगते कचरा प्रतिबंधक जाळे) बसवले जातील. या तंत्रज्ञानामुळे कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच अडवला जाईल. यामुळे जलप्रदूषण कमी होईल आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होऊन पूरस्थितीचा धोकाही टळेल.

गर्दीचे अचूक व्यवस्‍थापन
​गणेशोत्सव, नवरात्र आणि सुट्ट्यांच्या काळात मुंबईतील पर्यटन व धार्मिक स्थळांवर प्रचंड गर्दी होते. या गर्दीचे अचूक व्यवस्थापन करण्यासाठी मुंबईतील किमान पाच प्रमुख स्थळांवर प्रायोगिक तत्त्वावर एआयआधारित सीसीटीव्ही टुरिस्ट फुटफॉल मॉनिटरिंग सिस्टीम लागू केली जाईल. या प्रणालीमुळे पालिकेला रिअल टाइम (तातडीची) माहिती मिळणार असून, त्यानुसार सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे सोपे होईल.

लवकरच अहवाल सादर करणार
मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपायांचा वापर करून आपण नागरिकांचे जीवन अधिक सुकर करू शकतो, असा विश्वास नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी व्यक्त केला. महासभेने या प्रस्तावांचे स्वागत करीत महापालिका प्रशासनाला या तिन्ही प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.