Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
esakal June 25, 2026 03:45 AM

पुणे - उत्तर कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असताना मॉन्सूनने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असून, आज पाऊस कायम होता. या पहिल्या पावसामध्ये नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्यामुळे, चिंताग्रस्त झालेल्या चेहऱ्यांवर दिलासा झळकला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे.

हवामान अनुकूल असल्याने सलग तिसऱ्या दिवशी वेगाने वाटचाल करीत मॉन्सूनने महाराष्ट्राचा उर्वरित भाग व्यापला. मॉन्सून प्रगतीची उत्तरसीमा सध्या सुरत, इंदूर, मांडला, मोतिहारी येथून जात आहे. येत्या दोन दिवसांत मॉन्सून गुजरात आणि मध्य प्रदेशचा आणखी काही भाग व्यापू शकतो, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार बुधवारी सकाळपर्यंत कायम होती. मोसमी वाऱ्यांचा जोर जास्त असल्याने लगतच्या नाशिक, अहिल्यानगर आणि पुण्याच्या घाट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत कुलाबा येथे २४८ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे २२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली.

मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. बुधवारीही बराच काळ पाऊस सुरू राहिल्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले होते. जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला असून, केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले. अहिरावाडी गावामध्ये नाल्याला आलेल्या पुरामुळे काही घरे पडली.

तसेच, नागोरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची संरक्षण भिंत कोसळली. शाळेच्या परिसरात तब्बल दीड ते दोन फूट पाणी भरले गेले. शिक्षकांनी अन्य नागरिकांच्या मदतीने सर्व १४३ विद्यार्थ्यांना सुखरूप शाळेबाहेर काढले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावामध्येही ढगफुटीसदृश पाऊस झाला.

राज्याच्या अनेक भागांत हजेरी

  • मुंबईमध्ये शहर व उपनगरांसह ठाणे, वसई-विरार, पालघरला पावसाने झोडपून काढले. पाणी साचल्यामुळे लोकल व रस्ते वाहतूक संथगतीने

  • बंधाऱ्याला भगदाड पडल्याने रायगड जिल्ह्यातील देहेनगाव (ता. अलिबाग) व परिसराचा संपर्क तुटला.

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने नद्या प्रवाहित.

  • जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर परिसरामध्ये मुसळधार पाऊस.

  • छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी (ता. सोयगाव) येथे ढगफुटीसदृश पाऊस. मातीचा तात्पुरता पूल वाहून गेला.

  • हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.